आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोक्यांचे थर लावल्यास त्यावरून कडेलोट होईल:शिखर बँक घोटाळ्यावरून शिंदेंचा पवारांना इशारा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजित पवार यांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही, असे म्हणत खोक्यांचे जर थर लावले तर ते शिखर इतके उंच होईल की त्यावरून काहींचा कडेलोट होईल, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना रविवारी (ता.१८) गर्भित इशारा दिला. नागपूर येथे सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते.

ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणून पहिलेच माझे हिवाळी अधिवेशन आहे. खोके सरकार, स्थगिती सरकार अशी टिप्पणी योग्य नाही. आमचे कायदेशीर आणि बहुमताचे सरकार आहे. २०१९ चे सरकार अनैतिक होते. सोयरीक एकाशी अन् घरोबा दुसऱ्याशी त्या सरकारने केला होता. मागच्या सरकारमध्ये विदर्भातील मंत्र्यांनी, आमदारांनी नागपुरात अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पण कोविड कारण देऊन टाळले,’ असा दावा करत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिंदे पुढे म्हणाले, अजितदादांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभणारी नाही. खोक्यांचा जर एकावर एक थर लावला तर एवढे शिखर उंच होईल की बघता बघता नजर पोहोचणार नाही. पोहोचली तर तिथून कडेलोट होईल. यावर मी विधानसभेत बोलणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. शिखर बँक गैरव्यवहारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेता अजित पवारांना हा टोला लगावल्याचे सांगण्यात येते.

पूर्वीच्या सरकारात तरतूद २ हजार कोटींची आणि मान्यता ६ हजार कोटींची असे. ‘आमदनी अठण्णी अन् खर्चा रुपय्या’ असा तो कारभार होता. आम्हाला या राज्याचा लवासा करायचा नाही.

शिंदे म्हणाले की, { मुंबईत निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चात भगवे झेंडे कमी इतरांचे जास्त होते. {जत तालुक्यातील ४८ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी २ हजार कोटीच्या म्हैसाळ विस्तारीत प्रकल्पास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. { दिवाळीतला आनंदाचा शिधा ९६ टक्के शिधापत्रिकाधारकांना पोचला. {चालु अधिवेशनात कर्नाटक सीमाप्रश्नी सरकार ठराव मांडणार. { अधिवेशन चार आठवडे चालवण्याची सरकारची तयारी आहे.

बातम्या आणखी आहेत...