आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आई रागावते म्हणून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शिताफीने शोधून काढले, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई रागावते म्हणून एक अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना नागपूरमधील जरीपटका येथे उघडकीस आली. पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेनंतर ही मुलगी सुखरूप सापडली. 13 जून रोजी हुंडकेश्वर पोलिस ठाण्यामध्ये मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. घराबाहेर सायकल चालवित असलेली मुलगी परत न आल्याची तक्रार मुलीच्या आईने केली होती.

तरुण तुरुंगात

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला होता. तपासात मुलगी 12 जून रोजी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याचे स्पष्ट झाले होते. आईने घालून दिलेले निर्बंध झुगारून ती पळून गेली. या मुलीला पळून जाण्यासाठी तिच्या 20 वर्षीय प्रियकराने प्रोत्साहन दिल्याची माहिती तपासात समोर आली असून पोलिसांनी या प्रकरणी आता या तरुणाला ताब्यात घेतले आहे. सध्या हा तरुण तुरुंगात आहे.

फोन कॉलवरून माग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा या अल्पवयीन मुलीला घेऊन त्याच्या नातेवाईकाकडे गेला. त्यानंतर या दोघांनी भाडेतत्वावर एक खोली घेतली. दोघांनीही जरीपटकामधील एका मंदिरात लग्न केल्याची माहितीही पोलिसांनी दिली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर यांनी वेगवगेळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. या मुलीच्या आईच्या फोनवरुन करण्यात आलेले सर्व फोन कॉल्स तपासण्यात आले. मुलीची आई एकल माता (सिंगल मदर) असून ती एका लग्नाच्या हॉलवर काम करुन आपल्या दोन मुलींचे संगोपन करते.

असे पोहोचले मुलापर्यंत

मुलगी बेपत्ता होण्याआधी संपर्कात असलेल्या तीन मुख्य व्यक्तींची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्या तिघांचेही फोटो मिळवले. नंतर शक्यतांच्या आधारावर एका दुचाकीची नंबर प्लेट फोटोमध्ये दिसून आल्याच्या आधारे तिघांपैकी एकजण आरोपी असल्याचा अंदाज बांधत तपास सुरु ठेवला. या तरुणाने स्वत:चे सीमकार्ड नष्ट केले होते. मात्र आईशी बोलण्यासाठी त्याने एका नातेवाईकाचा फोन वापरला होता. पोलिसांनी त्या आधारे या मुलाच्या आईचा शोध घेतला आणि त्यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या हितासाठी हे प्रकरण सोडवायला मदत करा अशी गळ घातली. मुलाची आई आणि त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेतले, असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...