आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:काँग्रेसशिवाय आघाडी करू असे शिवसेनेने कधीही म्हटलेले नाही, नागपुरात संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आघाडी वगैरे हे शब्द बदला. या देशामध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका आल्या की आघाडीची चर्चा सुरू होते असे सांगतानाच काँग्रेस शिवाय आघाडी करू असे शिवसेनेने कधीही म्हटलेले नाही, असा खुलासा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर साडेचार तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. अनेक विषयांवर चर्चा केली. देशाच्या राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमतीही झाली आहे. भविष्यात राजकीय दिशा काय असावी यावरही चर्चा झाली. भविष्यात या दोन नेत्यांशिवाय इतर अनेक पक्षाचे नेते एकत्रित भेटणार आहेत, असे राऊत म्हणाले.

काँग्रेसशिवाय भाजपविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केले होते. त्याविषयी बोलताना राऊत यांनी शिवसेनेने असे कधीच म्हटले नसल्याचे स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी कहा है यूपीए असे विचारत काँग्रेस शिवाय आघाडीचे सूतोवाच केले होते. त्यावेळी नवी आघाडी काँग्रेससोबतच झाली पाहिजे असे सांगणारी शिवसेनाच होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

सपाची सायकल दहशतवादी बाॅम्बस्फाेटात वापरतात असे पंतप्रधान मोदींनी प्रचारसभेत म्हटले आहे. त्यावर बोलताना ही भाजपची सवयच आहे. पराभव समोर दिसायला लागला की ते अशा पद्धतीचे आरोप करतात असे राऊत म्हणाले. उत्तर प्रदेशात भाजप पराभूत होत असल्याने त्यांचे अखेरचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही. मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे कुटुंबासोबत आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. त्यांचा पक्ष दिवसागणिक झिजतो आहे, असा पलटवार राऊत यांनी केला.

रविवारी नागपुरच्या पोलिस आयुक्तांची सदिच्छा भेट घेतली. ते मुंबईलाही अधिकारी राहिलेले आहे. म्हणून नागपुरात आल्यावर त्यांना भेटलो. ज्यांची नावे (अमोल काळे आणि अजय ढवंगले) तुम्ही घेत आहात त्यांची माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही माहिती आहे आणि त्यांच्या संदर्भात लवकरच शक्यतो नागपूरला येऊनच बोलेन, असा इशाराही राऊत यांनी दिला.

माझी भाषा सौम्यच आहे
महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा बदलली आहे असे मुळीच वाटत नाही. महाराष्ट्रद्रोही, मराठीद्वेष्टे, भ्रष्टाचारी तसेच मनात महाराष्ट्र द्वेष असलेल्यांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावे असे आमचे संत सांगून गेले आहेत. “ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा’ असे तुकाराम महाराज सांगून गेले. हजार मारावी आणि मोजावी एक. त्यांची काय पूजा करून मिरवणूक थोडीच काढायची आहे. एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं, मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे.

बातम्या आणखी आहेत...