आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशात एक महिला पाच वेळा मुख्यमंत्री झाली असेल, तर महाराष्ट्रात महिलांना संधी मिळायला हरकत नाही. मात्र, ती संधी कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. मी त्यात शेंडेफळ आहे, असे वक्तव्य शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केले. विदर्भातील प्रबोधन यात्रेसाठी आल्या असता त्या नागपुरात माध्यमांशी बोलत होत्या.
काय म्हणाल्या अंधारे?
मला संघटनात्मक पातळीवर काम करायचे आहे. मला पक्षाची बांधणी करायची आहे. मी जिथे आहे तिथे मला सुखाने जगू द्या. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होऊ शकतील अशी अनेक नाव आहेत. असे मी मागे म्हटले होते. यामध्ये सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे आहे. मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेल्या शिवसेनेमध्येही अनेक महिला नेत्या आहेत. या सर्व वरिष्ठांमध्ये मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच आहे, असे अंधारे म्हणाल्या.
शिवसेना हा डाव उधळून लावेल
सीमेवरील वेगवेगळी गावे दुसऱ्या राज्यात जाण्याची भाषा करीत आहेत. हे भाजपाचे ठरवून केलेले आणखी एक कटकारस्थान आहे. गुजरातच्या निवडणुकीपूर्वी गुजरातला उद्योग दिले, आता कर्नाटक निवडणुकीपूर्वी कर्नाटकला अनेक गावं देण्याचा भाजपाचा डाव आहे. मात्र शिवसेना हा डाव उधळून लावेल असे अंधारे यांनी सांगितले.
अंधारेंनी केला आरोप
सातत्याने महापुरुषांच्या विरोधात होणारी वक्तव्य हा निव्वळ योगायोग नाही. कोश्यारी असेल, लोढा असतील किंवा गायकवाड असतील. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या सुनियोजित कटाचा भाग आहे. कारण पंतप्रधानांना रावण म्हणताच प्रतिक्रिया देण्यासाठी माध्यमांसमोर येणारे देवेंद्र फडणवीस महापुरूषांच्या टीकेनंतर मूग गिळून बसतात. एक चकार शब्द बोलत नाही. फडणवीसांच्या मनात खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भात सन्मान असता, तर त्यांनी सभागृहात निंदा ठराव मांडला असता. राज्यपालांच्या विरोधातला निंदा व्यंजक ठराव अपेक्षित आहे. मात्र तो अजूनही मांडण्यात आलेला नाही. आता कोश्यारींची गच्छंती अटळ आहे. हे लक्षात आल्यानंतर कोश्यारी स्वतःच पाय उतार होण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याची वातावरण निर्मिती भाजपा करीत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.