आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशात १५ जानेवारीपासून निधी संकलन मोहीम आखण्यात आली आहे. नागपुरसह विदर्भातील निधी संकलन मोहीमेचा शुभारंभ शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जूनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर येथून होणार आहे.
या निमित्त १५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचे विमानाने नागपूरात आगमन होणार असून , दुपारी ४ वाजता मोहिते भागाच्या निधी समर्पण कार्यक्रमात बन्सल यांचे निवास स्थान "राम वाटिका, वर्धमान नगर येथे उपस्थित राहतील. सायंकाळी ५.३० वाजता निधी समर्पण, गृहसंपर्क अभियानाच्या निमित्त्ताने रामजी महाराज मठ, राऊत चौक, मस्कासाथ येथून आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज परिसरात गृहसंपर्क करीत श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीकरीता भिक्षा मागतील.
१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान निधी संकलन केल्या जाईल. निधी संकलन पावती पुस्तक व कुपनच्या माध्यमातून केल्या जाईल. रुपये १०, १०० आणि १००० च्या रकमेचे कुपन्स रहातील. व रूपये २००० च्या वरील निधी करिता पावती दिल्या जाईल. रुपये २००० ते २०,००० पर्यंत रोख रक्कम देता येईल. केवळ धनादेशाद्वारे मिळणाऱ्या निधीस आयकराच्या कलम ८० जी (२) बी अंतर्गत आयकर सुट मिळेल. धनादेश वा रक्कम केवळ कार्यकर्त्यांनाच हस्तांतरीत करावे व पावती अथवा कुपन अवश्य प्राप्त करावे.
अभियानाची व त्या संबंधी माहिती देण्यासाठी न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेस नगर, नागपूर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे विदर्भ प्रांत कार्यालय सुरु करण्यात आले असून तेथे निधी संकलन व त्यासंबंधी मदत व माहिती उपलब्ध राहील. विदर्भ प्रांत कार्यालय प्रमुख शशांक सोहनी, सह कार्यालय प्रमुख मनोज पाटील, अभियान समितीचे विदर्भ प्रांत कोषाध्यक्ष म्हणून विनय चांगदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात कार्यालये सुरू केलेली आहेत. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी अशी विनंती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राद्वारे करण्यात आली असल्याचे प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे यांनी कळविले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.