आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चंद्रपूर:काेरोना नियंत्रणाबाहेर असल्याने चंद्रपुरात आजपासून सहा दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन

चंद्रपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ३ सप्टेंबरपासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या सूचना केलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कडक लॉकडाऊन करण्याच्या परवानगी करिता प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करताना दिली आहे.

३ ते ८ सप्टेंबरपर्यंत आरोग्य सेवा संदर्भातील आस्थापना वगळून सर्व प्रकारची दुकाने, किराणा दुकाने, सर्व व्यवसाय, आस्थापना या संपूर्णतः बंद राहतील. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते म्हणजेच किराणा दुकाने, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, मांस-मासे विक्री, पशुखाद्य इत्यादींच्या आस्थापना सुरू राहतील. इतर सर्व प्रकारचे दुकाने आणि आस्थापना बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत परवानगी संदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी. या कालावधीमध्ये नागरिकांनी घरातच राहून लॉकडाऊनचे पालन करावे आणि प्रशासनाला करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील स्थिती गंभीर

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालल्याने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार ६३३ झाली असून त्यातील १ हजार १९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ४२३ इतकी असून रोज रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याने सारेच चिंतेत आहेत.