आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावावर शोककळा:बेडवर झोपलेल्या भावंडांना सापाचा चावा; दोघांचाही मृत्यू, मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील घटना

भंडारा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री घरात बिछान्यावर झोपलेल्या चिमुकल्या भावंडांना मण्यार सापाने दंश केला. दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (खुर्द) येथे घडली. उत्कर्ष बलवीर डोंगरे (११), सुशील बलवीर डोंगरे (८) अशी मृत भावंडांची नावे आहेत. रविवारी रात्री जेवण केल्यानंतर ही दोन्ही भावंडे बेडवर झोपी गेली होती. विषारी मण्यार साप रात्री घरात शिरला. बिछान्यावर तो चढला आणि तेथे गाढ झोपलेल्या दोन्ही भावंडांना चावा घेतला. अंगाला काहीतरी चावल्याचा आणि चढल्याचा भास झाल्याने दोन्ही भाऊ झोपेतून अचानक जागे झाले.

दोघांनीही आरडाओरड केली. तेवढ्यात साप दिसला. दोन्ही मुलांना लगेच तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने दोघांनाही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान मोठा भाऊ उत्कर्षचा मध्यरात्री मृत्यू झाला. तर, प्रकृती चिंताजनक असल्याने लहान भाऊ सुशीलला पुढील उपचारासाठी मध्यरात्रीच तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. उपचारादरम्यान, सुशीलचा सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास नागपूर येथे मृत्यू झाला. सुशील हा इयत्ता दुसरीत, तर उत्कर्ष हा पाचवीचा विद्यार्थी होता. दोघेही देव्हाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होते. या घटनेने देव्हाडा (खुर्द) गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...