आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:भंडारा जिल्ह्यातील सोनी हत्याकांड प्रकरण; सातही आरोपींना आजन्म जन्मठेप

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरणी मंगळवारी अंतिम निकाल देताना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी सातही आरोपींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयात हा निकाल देताना, सर्व आरोपींना शिक्षेसाठी 275 पानांचे निकालपत्र तयार केले. हा निर्णय ऐकायला नागरिकांनी न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यात खून करण्यात आलेल्या बारा वर्षीय धृमील सोनी याचा आज वाढदिवस होता.

2014 मध्ये घडले होते सोनी हत्याकांड

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे हे हत्याकांड 26 फेब्रुवारी 2014 मध्ये तुमसर येथे घडले होते. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी संजय सोनी (42), त्यांची पत्नी पूनम सोनी (40) बारा वर्षीय मुलगा धृमील सोनी यांची त्यांचा चालक आणि त्याच्या सहा साथीदारांनी निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असा साडेतीन कोटींचा ऐवज पळवला होता. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसर येथून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.

800 पानांचे आरोपपत्र केले होते सादर

या हत्याकांडात बचावलेल्या संजय सोनी यांच्या मुलीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या हत्याकांड प्रकरणी 800 पानांचे आरोपपत्र सोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. पोलिसांनी याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर केले होते. या पुराव्याच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला. त्या आधारे आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

संजय सोनी यांचा गोंदिया जिल्ह्यातील तीरोडा तालुक्यातील बिरशी फाट्यावर नायलॉनच्या दोरीने गळा आवळला होता. गाडीत संजय सोनी यांचा मृतदेह आणल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा धृमील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता.45 जणांची साक्ष आणि बयाण नोंदविण्यात आले. सलग पाच वर्ष हा खटला चालला. आरोपींतर्फे भंडारा जिल्ह्यातील एकही वकिलाने खटला घेतला नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढलेल्या भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली. यापूर्वी उज्ज्वल निकम यांनी खैरलांजी येथील खटल्यात बाजू मांडून दहा पेक्षा अधिक आरोपींना शिक्षा ठोठवण्यासाठी बाजू मांडली होती.