आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाना पटोलेंनी कोणाच्या तरी सांगण्यावरून विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर १६ आमदार त्याचवेळी अपात्र ठरले असते का?
पृथ्वीराज चव्हाण : हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राज्यपातळीवर त्याची पूर्वकल्पना देणे किंवा चर्चा करणे अपेक्षित होतेच. ते अध्यक्षपदी राहिले असते १६ आमदारांवर त्याचवेळी अपात्रतेचा निर्णय कदाचित झाला असता. उद्धव ठाकरेंनी सल्लामसलतीने आघाडी सरकार चालवले असते तरी खूप फायदा झाला असता.
प्रश्न : नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलाच नसता तर सरकार वाचले असते का?
पृथ्वीराज चव्हाण : हे तर खरेच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचेही राजीनामे अवेळी आणि चुकीचेच होते. उद्धव ठाकरे यांना संसदीय प्रथा व परंपरांची माहिती नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
पण नाना पटोले यांना तर संसदीय प्रथा व परंपरांची माहिती होती. मग त्यांनी का राजीनामा दिला?
पृथ्वीराज चव्हाण : नाना हाच तर माझा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. नाना पटोले यांना संसदीय प्रथा व परंपरांची माहिती असतानाही त्यांनी दिल्लीतून कुणीतरी सांगितले म्हणून विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
काही का असेना पटोलेंनी राजीनामा द्यायला हवा होता का?
पृथ्वीराज चव्हाण : नाना पटोले यांनी पुढची तयारी केल्याशिवाय राजीनामा द्यायला नको होता. पण, ‘तुम्हाला प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे,’ असे सांगत दिल्लीतून कुणी सल्ला दिला माहिती नाही. त्यामुळे पटोलेंनीच त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला कुणी दिला हे सांगायला पाहिजे.
पण पटोलेंच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले. याची जबाबदारी कोणाची?
पृथ्वीराज चव्हाण : नानांना दिल्लीतून वरून कुणी राजीनामा देण्याचा सल्ला दिला ते माहिती नाही. सल्ला कुणीही दिला असला तरी जबाबदारी पक्षनेतृत्वाची असते. पण, काँग्रेसमध्ये जबाबदारी कुणाचीच नसते.
पवारांसारखे ज्येष्ठ नेते असताना उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यापासून कुणी रोखले का नाही?
पृथ्वीराज चव्हाण : उद्धव ठाकरे कुणाचे ऐकतात वा कुणाचा सल्ला घेतात तेही माहिती नाही. त्यातच लोकांना भेटण्याची आणि सल्लामसलत करण्याची सवय त्यांना नाही. ही सवय घातक आहे. म्हणून त्यांना कुणी सल्ला दिला नसावा...
ठाकरे अविश्वास प्रस्तावालाही सामोरे का गेले नाही?
पृथ्वीराज चव्हाण : कारण त्यांना संसदीय प्रथा, परंपरा माहिती नाही. १३ दिवसांचे सरकार कोसळले त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी सभागृहात जाऊन राजीनामा दिला होता. तसे उद्धव ठाकरेंनी केले असते तर त्यांचे मनाेधैर्य उंचावले असते. त्यांची वैयक्तिक आणि सरकारची प्रतिमा जनमानसात उजळली असती.
उद्धव ठाकरे आमदारकीचाही राजीनामा देणार होते म्हणतात. हे कितपत खरे आहे?
पृथ्वीराज चव्हाण : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन परत आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलाे. आणि विधान परिषदेत एकेक मत महत्त्वाचे असते, असे समजावून सांगितले. तेव्हा कुठे त्यांनी आमदारकीचा राजीनामा रोखला.
शिंदे-फडणवीस सरकार आता निश्चिंत झाले आहे, असे वाटते काय?
पृथ्वीराज चव्हाण : सरकारबद्दल अनिश्चितता आहे. अध्यक्षांनी राजकीय स्वार्थाकरिता वा राजकीय हेतूने निर्णय घेतल्यास न्यायालयात दाद मागता येईल. अध्यक्ष वेळकाढूपणा करतील अशी शक्यता आहे.
‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि नाना पटोले यांनी अवेळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंना तर लोकांना भेटणे टाळण्याची, सल्लाच न घेण्याची घातक सवय आहे,’ असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.