आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर क केलेला अर्थसंकल्प हा नव्या भारताची पायाभरणी करेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बजेटचे कौतुक केले आहे.
तर, हा अर्थसंकल्प म्हणजे भारत महासत्ता होण्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे. त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'सबका साथ, सबका प्रयास' च्या माध्यमातून 'जन भागीदारी'ची गरज ओळखून तंत्रज्ञान आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. अमृत काल अर्थसंकल्प सप्तर्षी थीमवर आधारित असून त्यात सात मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ते एकमेकांना पूरक आहेत आणि सप्त ऋषी म्हणून काम करतील. यामध्ये सर्वसमावेशक वाढ, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, अनलॉकिंग क्षमता, हरित वाढ, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र यांचा समावेश आहे.
नितीन गडकरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण आणि कृषी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर केलेली गुंतवणूक मैलाचा दगड ठरेल. यासोबतच वाहन स्क्रॅपिंग धोरणाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
लोकशाहीची फळ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, हम सब एक है या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे.
मुनगंटीवार म्हणाले, विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित 'सप्तर्षी योजना' म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवीत आणि अंत्योदयाचं पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो करोडो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.
शेतकऱ्यांची मोठी निराशा
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव अजित नवले यांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अजित नवले म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत मोदी सरकार दुप्पट करणार होते. प्रत्यक्षात पीक उत्पादनातून येणाऱ्या शेती उत्पन्नात घट झालेली आहे. सरकारी आकडेवारी नुसार पिकापासून शेतकऱ्यांना येणारे उत्पन्न प्रतिदिन केवळ 27 रुपयांवर आले आहे. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले गेल्याने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतो आहे. परिणामी मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा 3 लाख 25 हजारांपर्यंत पोहचला आहे. अशा पार्श्वभूमीवर मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशा तरतुदी न केल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.