आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजात मानसिक आरोग्यासंबंधी जागृती नाही. कोरोना पश्चात तर माणसाच्या सामाजिक वृत्तीला तडा जात आहे. लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतरवैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्याच प्रकारे व्यसनाधीनता वाढली आहे. या बाबी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. कोरोनापश्चात काळात आत्महत्या टाळण्यासाठी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. योग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना आणि पर्यायाने आत्महत्या टाळता येते, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे व डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी दिली. १० सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त ते बोलत होते.
योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर व्यक्तीस आत्महत्येपासून वाचवता येऊ शकते, असे मत दाेन्ही मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले. तज्ज्ञांचा सल्ला, योग्य औषधोपचार व समुपदेशनामुळे आत्महत्येच्या विचारांवर नियंत्रण मिळविता येते. ईसीटी (इलेक्ट्रोकन्व्हलसिव्ह थेरपी) ही नैराश्यातून येणाऱ्या आत्महत्येच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी तंत्र आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आत्महत्येच्या विचारांवर नियंत्रण मिळवून रुग्णाचा जीव वाचवता येतो.
एनसीबीचा अहवाल : भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या
२०१९ च्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीणपेक्षा शहरी भागात आत्महत्या अधिक आहेत. अविवाहित, पौगंडावस्थेतील तरुण व बेरोजगारांतही आत्महत्यांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. पारिवारिक व आर्थिक समस्यादेखील आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे.
योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते : तज्ज्ञ
महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र आत्महत्येचा प्रयत्न करण्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८०% व्यक्तींनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. असा आत्महत्येचा प्रयत्न केला गेला असेल तर योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते. याशिवाय नैराश्य, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनताही आत्महत्येस कारणीभूत ठरू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.