आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेशिमबागस्थित संघ मुख्यालयासह सुरेश भट सभागृह बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या महापारेषणच्या एका कार्यकारी अभियंत्याला सक्करदरा पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतले. आपली मानसिक स्थिती खराब असल्यामुळे आपण हे पत्र लिहिल्याची कबुली या अभियंत्याने दिली आहे. त्यात तथ्य आढळल्याने त्याला सूचना पत्र देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
25 नोव्हेंबरला सुरेश भट सभागृहात महापारेषणचा कर्मचाऱ्यांचा एक कार्यक्रम होणार होता. त्याच दिवशी सक्करदरा पोलिसांना सुरेश भट सभागृह बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र मिळाले. या अभियंत्याला हा कार्यक्रम होऊ द्यायचा नव्हता म्हणून ही निनावी धमकी देण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. हे पत्र पाहून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण सुरेश भट सभागृहाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. सध्या मुख्यालयात तृतीय वर्ग संघ शिक्षा वर्ग असल्याने संघाचे मोठे पदाधिकारीही आलेले आहे.
गोपनीयता बाळगत तपास सुरू
पत्र मिळताच पोलिसांनी गोपनीयता बाळगत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महापारेषणचा अभियंता दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मानसिक स्थिती खराब असल्याने असे केल्याची कबुली दिली. त्यावरून सूचना पत्र देऊन सोडण्यात आल्याचे सीपींनी सांगितले.
याधीही घडला आहे असा प्रकार
यापूर्वी शुक्रवार 7 जानेवारी 2022 रोजी रा. स्व. संघाच्या मुख्यालयासह इतर संवेदनशील ठिकाणांची जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी झाल्याचा प्रकार घडला होता. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँकेसारख्या महत्वाच्या ठिकाणांची जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
पोलिसांची आहे नजर
संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघ तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा वावर असतो. यापूर्वीही संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. संघ मुख्यालयाचा अतिशय संवेदनशील वास्तूंमध्ये समावेश होतो. पोलिसांनी या सर्व भागातला बंदोबस्त वाढवला आहे. पोलिस डोळ्यात तेल घालून या भागातल्या हालचालींवर नजर ठेऊन असतात.
फोटोग्राफी/व्हिडिओग्राफीला बंदी
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाने बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे. या पूर्वी 1 जून 2006 रोजी संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या दिवशीही शुक्रवारच होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.