आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:भरपावसामध्ये अंत्यसंस्काराची सुरगाणावासीयांवर पुन्हा वेळ, चंद्रपूर येथे सागवानच्या पानांनी झाकत केला अंत्यविधी

बोरगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर येथे स्मशानभूमी शेड नसल्याने सोमवारी (दि. ५) भरपावसात मोतीराम गबू बागूल (३५) यांच्यावर सागवानाच्या पानांनी झाकून अंत्यविधी करण्याची वेळ नातेवाइकांवर आली. अशा अनेक घटना सुरगाणा तालुक्यात आजपर्यंत घडत असूनही जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य अजूनही उमगलेले नाही.

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून कायमच वंचित राहिलेले असून मरणानंतरही अशा यातना सहन करण्याची वेळ येत आहे. चंद्रपूर येथे स्मशानभूमी शेड बांधण्यात आलेले नाही. येथील मोतीराम बागूल यांचे सोमवारी निधन झाले. गावात स्मशानभूमी शेड नसल्याने भरपावसात अंत्यविधी कसा करावा याची चिंता नातेवाइकांना होती. शेवटी सागवानाची पाने आणून त्यापासून संरक्षण देत मृताच्या नातेवाइकांनी अंत्यविधी कसातरी पार पाडला. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने शासनावर रोष व्यक्त केला. तालुक्यात एकूण ६१ ग्रामपंचायती असून गावपाड्यांची एकूण संख्या ३७२ आहे. यापैकी फक्त १०० ठिकाणीच अंत्यविधीसाठी शेड बांधण्यात आलेले आहेत. इतर सर्व गाव-पाड्यांची अवस्था अशीच आहे.

दोन वर्षांत तिसरी घटना सुरगाणा तालुक्यातील माळेगाव अंतर्गत येणाऱ्या पिळूकपाडा येथे २३ सप्टेंबर २०२१, वाघधोंड अंतर्गत साबरदरा येथे ९ जुलै २०२२ मध्ये घडली आहे. या अगोदरही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु, त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

अधिकाऱ्यांची तीच तीच उत्तरे ज्या गावात स्मशानभूमी नाही अशा गावात कार्यरत ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता जागा वनविभागाची असल्याने विकासकामे करता येत नाही हे ठोकळेबाज उत्तर नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही.

बातम्या आणखी आहेत...