आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात एकेकाळी नागपूर व्हर्सेस बीड असा संघर्ष चालायचा. तेव्हा भाजप नेते नितीन गडकरी हे जाणीवपूर्वक बहुजन नेते गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंसोबतही तेच...
भंडारा येथे झालेल्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी अंधारे म्हणाल्या, एकेकाळी नितीन गडकरी हे गोपीनाथ मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवून हैराण करून सोडायचे. जाणीवपूर्वक त्यांना कोंडीत पकडायचे. आता तेच मुंडेंच्या दुसऱ्या पिढीसोबतही सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडेंना त्रस्त करून सोडत आहेत. त्यांना हैराण करत आहेत.
वाद पेटण्याची शक्यता
सुषमा अंधारेंच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. तसेच, यामुळे आता नवा वाद पेटण्याचीही शक्यता आहे. भाजपकडून तसेच देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
माझ्यामागे ईडी लावू शकत नाही
भंडाऱ्यातील महाप्रबोधन मेळाव्यात सुषमा अंधारे म्हणाल्या, फडणवीस ज्याप्रमाणे पंकजा मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय, त्याचप्रमाणे मी बीडमध्ये आल्यास मलाही हैराण करण्याचा प्रयत्न करू शकता. माझ्यामागे ईडी लावू शकता. मात्र, त्यामुळे मला काहीही फरक पडणार नाही. उभ्या महाराष्ट्रात माझ्याकडे एक एकर जमीनही नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझ्याविरोधात एक जरी आरोप ते सिद्ध करू शकले, तर मी महाप्रबोधन यात्रेत दिसणार नाही.
'वर्षा'च्या पायऱ्या सन्मानाने चढू
सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केला. अंधारे म्हणाल्या, ज्या पद्धतीने तुम्ही उद्धव साहेबांना वर्षावरून पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याहून पन्नासस पट अधिक सन्मानाने त्या पायऱ्या चढताना पाहण्यासाठी शिवसैनिक जिवाचं रान करायला तयार आहेत
संभाजी भिडेंवर टीका
अमृता फडणवीस यांनी मंगळसूत्र घातले की, मला गळा आवळल्यासारखे होते, असे वक्तव्य केले आहे. असे सांगत सुषमा अंधारे म्हणाल्या, टिकलीवरून महिला पत्रकाराला बोलणारे संभाजी भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? संस्कृती जपणारे भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांना जाब विचारतील का? असा प्रश्न अंधारेंनी विचारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.