आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धवनकरांना निलंबित करून एसआयटी स्थापन करा:नीलम गोऱ्हेंची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांकडे मागणी

नागपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर विद्यापीठात, लैंगिक छळ केल्याची भीती दाखवून 2018 ते 2020 च्या दरम्यान काही प्राध्यापकांकडून खंडणी वसुली प्रकरणातील आरोपी, जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून एसआयटी स्थापन करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांकडून पैसे उकळण्याचे प्रकरण गंभीर आहे. विद्यापीठातील काही प्राध्यापकांकडून "तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली आहे', अशा आशयाची भीती दाखवून जनसंवाद विभागातील डॉ. धर्मेश धनवकर यांनी प्राध्यापकांची फसवणूक केली. तसेच खंडणी वसूल केली. या गंभीर घटनेवर विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना शनिवारी निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी प्रा. धर्मेश धवनकर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात त्या म्हणतात की, या सातही प्राध्यापकांनी काही चूक केली नव्हती, तर त्यांनी असे भीतीपायी लाखो रुपये का दिले असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. ते खंडणी मागणाऱ्या धवनकर यांना न घाबरता पोलिसांकडे तक्रार करू शकत होते. मात्र त्यांनी घाबरून खंडणी का दिली याचाही विचार होणे गरजेचा आहे. या प्रकरणी सखोल तपास होणे गरजेचे आहे. या पूर्वीही नागपूर विद्यापीठामध्ये काही मुलींचे शोषण होऊन पैसे वसूल करून प्रकरण दडपले गेले का, याचा तपास होणे गरजेचे आहे.

धर्मेश धवनकर यांनी 2018 ते 2020 च्या दरम्यान विभागातील 7 प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार असल्याची सांगत त्यांच्याकडून प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 15 लाख 50 हजार रुपये घेत फसवणूक केल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी आपल्याकडे आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात धवनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच याप्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी गोऱ्हे यांनी केली आहे. या विषयी डॉ. गोऱ्हे लवकरच राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...