आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात बेरोजगारी वाढली आहे, तरुणांच्या हाताला काम नाही, असे एक नरेटिव्ह अर्थात समज सेट केले जात आहे. मात्र स्वदेशी जागरण मंचाने येत्या तीन वर्षांत देशातील बेरोजगारी संपुष्टात आणण्याचा निश्चय केला असून त्या दिशेने काम सुरू केले आहे. केंद्र, राज्य सरकार, महापालिका, पालिका आणि पंचायतराज संस्था मिळून देशभरात १५,६०० योजनांच्या माध्यमातून प्रत्येक बेरोजगाराला काम देण्यात येत असल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचाचे अ. भा. संघटक काश्मीरीलाल यांनी “दिव्य मराठी’ला दिली. ते म्हणाले, “आम्ही निवडणुकीसाठी काही करत नाही. रोजगारात एक अप्रत्यक्ष रोजगार असतो. तशी काही मदत सहज होऊ शकते.’ “नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे व्हा’ या थिमवर स्वदेशी जागरण मंच काम करत आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रोजगार केंद्र सुरू केले जाणार असून नाेकरीची मानसिकता बदलून नवउद्योजक घडवायचे आहेत. यासाठी फर्स्ट जनरेशन इंटरप्रेनर्स तसेच शून्यातून विश्व उभे केलेल्या नवउद्योजकांचा सत्कार केला जात असल्याचे काश्मिरीलाल म्हणाले. आतापर्यत ६ हजारपेक्षा अधिक जणांना सन्मानित केले असल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील १ हजार विद्यापीठे आणि ५३ हजार महाविद्यालयांत रोजगार देणारे कार्यक्रम सुरू केले आहेत, असे त्यांनी सांगितले. नवउद्योजकांना ‘मॅन, मशीन, मनी, मार्केटिंग आणि मॅनेजमेंट’ या ५ पाच ‘एम’वर करणार मदत.
४३१ जिल्ह्यांत जिल्हा रोजगार केंद्र
“कमवा आणि शिकवा’ योजना हा विषय देशभरातील ६ लाख विद्यार्थ्यांसमोर नेला. आज ५२५ जिह्यांत स्वजामंचाचे सक्रिय यूनिट कार्यरत आहेत. एका यूनिटमध्ये कमीतकमी १५ ते जास्तीत जास्त ५५ सदस्य कार्यरत आहेत. तर ४३१ जिल्ह्यांत जिल्हा रोजगार केंद्र सुरू आहेत. संघ परिवारातील इतर २० संघटना या कामात मदत करत असून येत्या तीन वर्षाच्या आत बेरोजगारी संपुष्टात येऊन आमचा युवक स्वावलंबी होईल, असे ते म्हणाले.
पाच ‘एम’चा असा घेणार आधार
नवउद्योजकांना “मॅन, मशीन, मनी, मार्केटिंग आणि मॅनेजमेंट’ या पाच एमवर मदत करण्यात येणार असल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचाचे पश्चिम क्षेत्र सहसंयोजक प्रशांत देशपांडे यांनी दिली. “स्वावलंबी भारत अभियानाद्वारे’ युवकांना नोकरी देणारे घडवले जाईल. महाराष्ट्राचे ३६ जिल्हे आहेत. गोव्याचे मिळून ३८ जिल्हे असून सध्या विदर्भ ३, देवगिरी २, पश्चिम महाराष्ट्र ७, कोकण ६ अशी १८ रोजगार केंद्रे सुरू असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. राज्यात ४१९ सरकारी तर ५५० खासगी आयटीआय आहेत. या सगळ्यांना या केंद्रांशी जोडून देत कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
अॅपच्या माध्यमातून जोडणार
“मेरा स्वावलंबी भारत अभियान’ अॅप (mysba) सुरू करण्यात आले असून या अॅपद्वारे नवउद्योजकांना प्रकल्प अहवाल तयार करणारे, बँका, प्रकल्प व्यवस्थापक आदींशी जोडण्यात येईल. यासाठी १२ हजार स्वयंसेवक काम करत आहेत. उद्योजकांचे काउन्सिलिंग, विस्तारासाठी मदत करण्यासाठी तज्ज्ञांची यादी तयार केली जात आहे. प्रत्येक बेरोजगारापर्यत सरकारी योजना पोहचवण्यासाठी प्रत्येक राज्यात उद्योग यात्रा काढण्यासह शिबिरे घेण्यात येत असल्याचे काश्मिरीलाल यांनी सांगितले.
मुंबईत हवेत ४० हजार पेड डॉग सिटर
करणाऱ्यासाठी हजार वाटा असतात. फक्त या वाटांचा शोध घेण्याची इच्छा हवी. लहान मुले सांभाळण्यासाठी बेबी सिटर हवे असतात तसे एकट्या मुंबईत ४० हजार डाॅग सिटर केवळ श्वान सांभाळायला हवे आहेत. मुंबईत ६५ हजार श्वान पाळणारे आहेत. या श्वानांना सांभाळण्यासाठी पेड डाॅग सिटर हवे आहेत. यासाठी महिन्याला १५ ते २५ हजार मोजायला लोक तयार आहेत. तर ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी सुमारे सव्वा लाख परिचारिका हव्या असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.