आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत ऑस्ट्रेलिया T20 सामन्यावर पावसाचे सावट:3 वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना; 44 हजार प्रेक्षक संख्या

नागपूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरस्थित जामठा येथील स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रिकेटप्रेमींची चिंता वाढली आहे. शुक्रवार, 23 सप्टेंबरला जामठा येथील स्टेडियमवर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, प्रादेशिक हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावल्याने व्हीसीएची प्रशासनही चिंतेत आहे.

स्टेडीयमची 44 हजार प्रेक्षक क्षमता

नव्याने स्थापित केलेल्या एलईडी फ्लड लाइट्स अंतर्गत हा खेळ दिवस-रात्र खेळला जाईल. या स्टेडियमची क्षमता 44 हजार प्रेक्षकांची आहे. जवळपास तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्याचे आयोजन होत आहे, पण आता यावेळी ढगांचे सावट स्टेडीयमवर आहे.

20 मिनिटांत 40 हजार तिकीट विक्री

अवघ्या 15 ते 20 मिनिटांत टी-ट्वेंटी सामन्याची 40 हजार ऑनलाईन तिकीटे विकली गेली. यामुळे बहुतांश क्रिकेट प्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला. त्यामुळे तिकीटे न मिळालेल्या क्रिकेट प्रेमींनी सामन्याच्या दिवशी पाऊस येवो अशी बाेटे मोडली. सोशल मीडियावर तशी चर्चाही रंगली होती आणि नेमका गुरूवारी पाऊस आला आहे. बुधवारी सामन्यासाठी दोन्ही संघांचे आगमन झाले.

प्रेक्षकांसाठी पार्किंगची सोय
व्हीसीएने स्टेडियमजवळ पुरेशी मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन व्हीसीएने केले आहे. व्हीसीएने फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ईस्ट स्टँड (तळमजला, बे A, B आणि C) मध्ये 4 हजार 400 तिकिटे आरक्षित केली आहेत. तिकिटाची किंमत 100 रुपये ठेवली आहे. विद्यार्थ्यांची यादी, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित करून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या ओळखपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.

बारकोड स्कॅन करावा लागेल

दोन्ही संघ 21 सप्टेंबरला चार्टर्ड विमानाने नागपुरात दाखल झाले. आणि 22 सप्टेंबर रोजी त्यांचे सराव सत्र आहे. ऑस्ट्रेलियन संघ दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत तर टीम इंडिया जामठा स्टेडियमवर फ्लडलाइट्सखाली सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सराव करणार होती. सामन्याच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता प्रेक्षकांसाठी गेट उघडले जातील. टर्न स्टाइलवर बार कोड स्कॅन केल्यानंतर तिकीटधारकांना स्टँडवर प्रवेश मिळेल.

महामेट्रोची विशेष सोय

क्रिकेट प्रेमींकरता महा मेट्रोने विशेष सोय केली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीनुसार, महा मेट्रोने न्यू एअरपोर्ट स्टेशन येथून मेट्रो गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. सामना संपल्यावर एक वाजे पर्यंत मेट्रो तर्फे गाड्या चालणार आहे.

बातम्या आणखी आहेत...