आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारने साहित्य संमेलन भरवणे ही कल्पना कोणत्याही स्वतंत्र देशाला आणि स्वतंत्र समाजाला मानवणारी नाही. सरकारी साहित्य संमेलनांमुळे यथावकाश साहित्याचे सरकारीकरण होऊ शकते, असे खडे बोल सुनावतानाच साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल, पण तो सरकारच्या नियंत्रणात जाऊ नये याचे भान साहित्य संस्था आणि साहित्यिकांनी राखले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मांडली.
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ख्यातनाम हिंदी साहित्यिक डाॅ. विश्वनाथप्रसाद तिवारी, हिंदी कवी कुमार विश्वास, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. यापूर्वीही वाङ्मयाला सरकारच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न हुकूमशाही आणि साम्यवादी देशांत झाले. महाराष्ट्र शासनाने साहित्य संमेलन भरवणे ही घटना चिंताजनक आहे. आपले साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी पुरेशा गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. साहित्य व्यवहार सरकारी नियंत्रणात जाता कामा नये याचे भान साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी राखलेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका न्या. चपळगावकर यांनी मांडली.
साहित्यिकांनीच वाढवल्या अडचणी : साहित्य संमेलनाला राजकीय पुढाऱ्यांना बोलवावे की नाही, त्यांना रसिक म्हणून बोलवावे की मार्गदर्शक म्हणून बोलवावे, याची चर्चा यापूर्वीही झालेली आहे. मंत्र्यांना व्यासपीठावर बोलवायचेच नाही इथपासून तर व्यासपीठावर त्यांची उपस्थिती गृहीतच धरायची इथपर्यंत आपली प्रगती झालेली आहे.
अनुदाने आपल्याला पांगळी करतात
कालांतराने सामान्य माणसापासून धनिकांपर्यंत कुणालाही वर्गणी मागण्याची सवय राहिली नाही आणि आपण कमी श्रमात अर्थपुरवठा शोधू लागलो. आज आपण अनुदानाशिवाय कार्यक्रम करू शकत नाही. आज हवीहवीशी वाटणारी अनुदाने आपल्याला पांगळी करू शकतात, याकडे चपळगावकर यांनी लक्ष वेधले. साहित्य संस्कृतीचा व्यवहार जेवढा स्वत:च्या पायावर उभा राहील तेवढे आपले साहित्य समृद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास चपळगावकर यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.