आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवसानघातकी इतिहास शिकवला:विद्यापीठांना संतांची, वैज्ञानिकांची नावे द्या; राजकारण्यांच्या नावात काय, राज्यपाल कोश्यारींचा सवाल

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला महाराष्ट्राचे नेहमी कौतुक वाटते. कारण येथे विद्यापीठे कोणत्या ना काेणत्या संतांच्या नावाने आहेत. त्यापासून नवा विचार मिळतो. विद्यापीठांना एकतर संतांची वा वैज्ञानिकांची नावे द्या. राजकारण्यांच्या नावात काय ठेवले आहे, असा सवाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर येथे उपस्थित केला. तसेच आपल्याला अवसानघातकी इतिहास शिकवला असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

रातुम नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला अणुशास्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 2007 पासून दिल्या जाणारा जीवनसाधना पुरस्कार सुप्रसिद्ध उद्योजक पुरूषोत्तम अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला. अग्रवाल हे नागपूर विद्यापीठाच्या औषध निर्माण शास्र विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. शतदीप पर्व ही स्मरणिका यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

चुकीचा इतिहास शिकवला

राज्यपालांनी राजकारण्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठांवर अप्रत्यक्ष टीका केली. यापूर्वी आपल्याला अवसानघातकी आणि चुकीचा इतिहास शिकवला. आपण काहीच केले नाही, अशी नकारात्मक भावना त्यातून बळावत गेली. आपला गौरवशाली आणि दैदीप्यमान इतिहास सांगितलाच नाही. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय अस्मिता आणि संस्कृती जागृत ठेवण्याचे काम केले आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांच्या सूचना मागवून नवे शैक्षणिक धोरण तयार केले आहे.

आज मोदींचे गारुड

कोश्यारी पुढे म्हणाले की, आज मोदींच्या नेतृत्वात भारत झपाट्याने बदलत आहे. एकेकाळी देशावर नेहरूंचे गारूड होते. आज मोदींची जादू आहे. नव्या बदलत्या भारतामुळे केवळ देशातच नव्हे तर विदेेशातही लोकांना भारतीय असण्याचा अभिमान वाटत आहे. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. येथून दिलेला विचार वा कृती देशभर जाते. शतकोत्तर महोत्सवी वर्षात नागपूर विद्यापीठाने देशाला अभिमान वाटेल असे काम करावे. त्यासाठी खूप मोठे आणि भव्यदिव्य कार्यक्रम आखण्याची गरज नाही. लहान लहान कार्यक्रमांतून समर्पित वृत्तीने काम करीत आदर्श उदाहरण ठेवावे असे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...