आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी (ता. 7) 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 25 नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नवीन रुग्णांमध्ये नागपूर शहरातील 15, ग्रामीणमधील 7, जिल्ह्याबाहेरील 3 अशा एकूण 25 रुग्णांचा समावेश आहे.
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळुहळ वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंगळवारी मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूमध्ये आरोग्य विभागाची एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयुक्तांनी उपरोक्त निर्देश दिले.
दिल्ली आणि मुंबई येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी चाचणी करण्याचेही निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाद्वारे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजार अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी सुपर स्पेडर्स ठरणाऱ्या व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रवाश्यांची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले.
प्रारंभी आयुक्तांनी सर्व झोनमध्ये कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. कोरोना संसर्गाची साखळी ख्ंडीत करण्यासाठी सर्वप्रथम कोरोना संशयीत तसेच लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक असून त्यांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करण्यात यावी आणि बाजारपेठेत रॅपिड अँटीजेन चाचणी केली जावी. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रवासाची पार्श्वभूमी लक्षात घेउन त्यांची सर्व ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्यात यावी. त्यांच्या संपर्कातील सर्व निकटवर्तीयांची चाचणी करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.