आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील हल्लेखोर वाघ अखेर जेरबंद:डार्ट मारून बेशुद्ध केले त्यानंतर पिंजराबंद, चंद्रपूरला हलवणार

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यप्राणी संघर्षाच्या घटना वारंवार घडतात. विशेषत: जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेले गावकरी वाघाने केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटना नेहमी घडतात. अशाच एका हल्लेखोर वाघाला गुरूवारी डार्ट मारून बेशुद्ध करीत पिंजराबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा वाघ अंदाजे दोन ते अडीच वर्षांचा असुन वैद्यकीय तपासणीनंतर त्याला चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे हलवण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनक्षेत्रात टी-103 सॅम या वाघाचा वावर होता. 28 जून ते 16 ऑगस्ट या कालावधीत या वाघाने अनेक ग्रामस्थांवर हल्ले केले. तर काहींना ठार मारल्याच्या घटना घडल्या. 17 ऑगस्ट रोजी या वाघाने शेतात काम करीत असलेल्या विलास विठोबा रंधये (रा. मेंढा) यांना लोकांसमोर ओढत नेले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. लोकांनी वाघाचा बंदाेबस्त करण्याची मागणी केली होती.

अशी आखली योजना

लोकांमधील वाढता असंतोष पाहाता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्याशी चर्चा करून वाघाला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या नुसार वाघाच्या हालचालीवर रात्रंदिवस लक्ष ठेवण्यात आले. गुरूवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी हल्लेखोर वाघ शेतशिवारात फिरत असल्याची माहिती मिळाली. लागलीच पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे, सशस्र पोलिस अजय मराठे वाघाला डार्ट मारण्यासाठी सज्ज झाले. वाघ मोकळ्या जागेत येताच डाॅ. रविकांत खोब्रागडे यांनी अचूक निशाणा साधीत डार्ट मारला. त्यात बेशुद्ध झालेल्या वाघाला पिंजराबंद करण्यात आले.

बेशुद्ध करून केले जेरबंद

यापूर्वी 21 फेब्रुवारी 2022 रोजी चंद्रपूर वीज केंद्र वसाहतीत रात्री सव्वा नऊ वाजता वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते. हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी वीज केंद्र परिसरात रेस्कू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. चंद्रपूर महा औष्णिक केंद्रात वाघ-बिबट्या यांचा वावर वाढला आहे. वाघाच्या हल्ल्यात लोक ठार झाल्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...