आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुकांनी गर्दी करू नये:नागपूरच्या बडकस चौकात व्यापाऱ्यांनी लावलेल्या बॅनरची तर्री पोह्यावर ताव मारत चर्चा

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण साऱ्यांनी पुणेरी पाट्या वाचल्या. त्यावरचे नाना जोक भरभरून फॉरवर्ड केले, पण आता नागपूरकरही त्याबाबतीत आघाडीवर आहेत. एका व्यापाऱ्याने लावलेले असेच बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

नेमके प्रकरण काय?

सध्या राज्यात मोसमी वारे वाहात नसले, तरी निवडणुकांचे वारे जोराने वाहात आहे. १० जून राेजी राज्यसभा आणि त्या नंतर होणाऱ्या विधान परिषद निवडणूकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. हे झाले मोठ्यांचे. पण, महापालिका निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार असलेले कार्यकर्ते आतापासूनच चौकाचौकात एकत्र येऊन तर्री पोह्यावर ताव मारीत तावातावाने चर्चा करीत आहेत. हाफ प्लेट पोहे आणि एक कटींग चहा घेऊन तासनतास गप्पा मारणाऱ्या कार्यकर्त्यांना कंटाळून महालमधील व्यापाऱ्यांनी शेवटी ‘इच्छुकांनी गर्दी करू नये’ असे बॅनर लावले. ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रत्येकाचा एक गढ

नागपुरात प्रत्येक पक्षाची मतपेढी वा एरीया आहे. पश्चिम नागपूर आणि महाल म्हटले की भाजप, पूर्व व दक्षणि नागपूरमध्ये काँग्रेस आणि उत्तर नागपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाचा बोलबोला असतो. महालमधील बडकस चौक म्हणजे भाजपचा गढ आहे. सकाळी फिरणे झाल्यानंतर भाजप नेत्यांचे हमखास भेटण्याचे ठिकाण आहे. सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची गर्दीही येथेही वाढत आहे. खरे म्हणजे येथील व्यापारीही भाजप समर्थक आहे. पण, त्याचा त्रास व्यापाऱ्यांना व्हायला लागला. त्यामुळे त्यांनी ‘इच्छुकांनी गर्दी करt नये’ असा फलकच लावला. सध्या या फलकाची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बडकस चौकात भाजप प्रदेश प्रवक्त्याचे कार्यालय आहे. शिवाय माजी महापौर व शहर अध्यक्षांचे निवासस्थानही चौकापासून काही अंतरावर आहे. भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना भेटायचे असेल तर त्याला बडकस चौकात बोलावले जाते. रोज सकाळी येथे कार्यकर्ते, नेत्यांची वर्दळ असते. नंतर गप्पांचे फड रंगतात.

गर्दी कमी झाली नाही, पण...

सध्या महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने गप्पांचा विषय तोच असतो. कोण कुठून लढणार, कोणता वार्ड राखीव झाला, कोणाला तिकीट मिळणार, कोणाचे नाव कापले जाणार? कोण कुठल्या पक्षात जाणार यावर चर्चा रंगते. यात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक असते. या गर्दीची चौकातील व्यापाऱ्यांना अडचण होऊ लागली. मग व्यावसायिकांचा समावेश असलेल्या ‘बडकस चौक मित्र परिवार’ या संघटनेने कोणाला सांगून मन दुखावण्यापेक्षा ‘या ठिकाणी इच्छुक कार्यकर्त्यानी गर्दी करु नये’ असे आवाहन करणारा फलक लावला. या फलकामुळे गर्दी तर कमी झाली नाही. पण त्याचीच चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...