आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात ३१ मे रोजी वाघिणीने दुपारी ४ वाजताच्या सुमारास एका बछड्यास जन्म दिला. नंतर या बछड्याला उचलताना वाघिणीचाच दात लागून त्याचा मृत्यू झाला. ली आणि राजकुमार या वाघांच्या जोडीला बछडे होण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. लीचे वय जास्त (साधारण ११ वर्षे) असल्याने प्रयत्नांना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी येत होत्या. गेले महिनाभर ली वाघिणीला राजकुमारपासून स्वतंत्र ठेवून तिच्या गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होण्यासाठी रात्र निवाऱ्यात विशेष बाळंत गुफा तयार करण्यात आली. या गुफेत तापमान आणि प्रकाश नियंत्रण व्यवस्थेव्यतिरिक्त रबरी मॅट, गवताच्या गाद्या याशिवाय कूलर लावण्यात आला होता. वाघिणीच्या नैसर्गिक वर्तणुकीत बदल न होता लक्ष देण्यासाठी विशेष सीसीटीव्ही बसवण्यात आले होते.
या वेळी प्राणिसंग्रहालय संचालक एस. एस. भागवत, वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धुत, प्राणिप्रसव विभागाचे तज्ज्ञ डॉ. एम. एस. पाटील, प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. मयूर पावशे आणि डॉ. सुजित कोलंगठ, जनरल क्युरेटर दीपक सावंत, बायोलॉजिस्ट शुभम छापेकर उपस्थित होते. अखेर दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर वाघिणीला बछडा झाला, पण तिचाच दात लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सहा वर्षांपूर्वी चार बछड्यांना आईनेच मारले
यापूर्वी वाघिणी ली २०१६ मध्ये साहेबराव नावाच्या वाघापासून एकदा गर्भार राहिली होती. त्या वेळी तिने चार बछड्यांना जन्म दिला होता. तथापि त्या वेळेस तिला मातृत्वभावना नसल्याने काही वेळातच तिने सर्व बछड्यांना मारून टाकले होते. आईपासून लहानपणीच विभक्त झालेल्या बहुतेक मांसाहारी प्राण्यांमध्ये अशी लक्षणे पहिल्या बाळंतपणात दिसून येतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.