आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत बुडून मृत्यू:बारावी पास होण्याचा आनंद निखिलसाठी ठरला क्षणभंगूर, नदीत बुडून मृत्यू, आनंदोत्सवासाठी मित्र गेले होते फोटोशूटसाठी

भंडारा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला. यात पास झालेले तीन जिवलग मित्र आनंदाच्या भरात वैनगंगा नदीच्या माडगी नदीपात्रात गेले होते. तिथे आनंदोत्सव साजरा करताना त्यांनी मोबाइलवर सेल्फीसह काही फोटो घेतले. त्यानंतर पाण्यात उतरलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

निखिल महादेव बालगोटे (१७) रा. गुरुनानक वॉर्ड, तुमसर असे मृतकाचे नाव आहे. निखिल तुमसर येथे राहत असला तरी, त्याचे शिक्षण हरदोली येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. तिथूनच त्याने बारावीची परीक्षा दिली होती. त्यात त्याला ५७ टक्के गुण मिळाले. बुधवारी निकाल बघितल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी निखिल त्याचे मित्र भावेश गणेश मोटघरे (१७) रा. अभ्यंकर नगर, तुमसर, हर्षित अरुण घटारे (१६) रा. तुमसर यांच्यासह तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीवर पोहाेचले.

तिथे त्यांनी नदीपात्रात असलेल्या रेल्वेच्या लोखंडी पुलावर मोबाइलवर सेल्फीसह एकत्र फोटो काढले. त्यानंतर नदीपात्रात एकत्र बसून त्यांनी पुढील शिक्षणाबाबत गप्पा मारत हास्यविनोद केला. थोड्यावेळाने निखिल चेहरा धुण्यासाठी नदीत गेला. मात्र त्याला आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही व ताे अंदाज न अाल्याने खोल पाण्यात बुडू लागल्याने गटांगळ्या खात मदतीसाठी मित्रांना आवाज देत होता. दोन्ही मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी धावपळ केली. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि बघताबघता जिवलग मित्र खोल पाण्यात बुडून दिसेनासा झाला.

त्यांनी घटनेची माहिती तुमसर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पथकासह घटनास्थळ गाठले. स्थानिक मच्छीमार बांधवांच्या मदतीने निखिलचा शोध घेतला असता सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. बारावीची परीक्षा पास झालेला निखिल नियतीपुढे आयुष्याची परीक्षा नापास झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

बातम्या आणखी आहेत...