आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:नक्षल्यांनी आधी शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात यावे, मराठा युवा संघाचे माओवाद्यांना आवाहन

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंसाचारात आकंठ बुडालेल्या खंडणीखोर नक्षलवाद्यांची मराठा समाजाला सल्ला देण्याची लायकी नाही

आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला अनाहूत सल्ला देण्यापेक्षा नक्षल्यांनी आधी शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन मराठा युवा संघाने केले आहे. मराठा समाजाने आरक्षण या विषयावर राजकीय नेतृत्त्वाची मदत घेऊ नये, असे नक्षल्यांना खरोखर वाटत असेल तर त्यांनी शस्त्र खाली ठेऊन शरणागती पत्करावी तसेच मुख्य प्रवाहात यावे. असे केल्यास त्यांच्या सल्ल्याचा नक्की विचार केला जाईल, असे मराठा युवा संघाचे अध्यक्ष महेश शिवाजीराव महाडिक यांनी दिला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) महाराष्ट्र कमिटीचा सचिव सह्याद्रीने मराठा समाजाला उद्देशून आरक्षणासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. त्या पत्रात त्याने मराठा समाजासाठी नक्राश्रु ढाळत राजकीय नेतृत्त्वापासून लांब राहण्याचा सल्ला न मागता दिलाय. नक्षलवादी चळवळीतील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला मानत नाहीत. भारतीय संस्कृतीपेक्षा ज्यांना लेनीन, स्टॅलिन आणि माओ-त्से-तुंग जवळचा वाटतो. भारत-चीन यांच्यात १९६२ साली झालेल्या युद्धांत ज्यांच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी भारतीय सैन्यासाठी जाणारी रसद दार्जलिंग येथे तोडण्याचे काम केले. अशा विचार आणि परंपेचे लोक आता मराठा समाजाला सल्ले देऊ लागले आहेत. त्यामुळे अशा अनाहूत सल्ल्यांवर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

नक्षलवादी काय आहेत आणि त्यांच्या सशस्त्र हिंसाचाराने आजवर कुणाचे भले झाले हा संशोधनाचाच विषय आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी खंडण्या उकळणारे लोक आता मराठा समाजाला सल्ला द्यायला निघाल्याचे पाहून तिटकारा वाटतो. एखाद्या नक्षलवाद्याने स्वतःचे नाव सह्याद्री ठेवले म्हणजे तो सह्याद्रीच्या कुशीत वावरणाऱ्यांना सल्ला देण्यास लायक झाला असे समजण्याचे काही कारण नाही. मराठा समाजाचे प्रबोधन करणारी पत्रके जारी करण्याऐवजी नक्षलवाद्यांनी आदिवासी, मागास आणि दलित समाजाच्या उद्धारासाठी काम करावे.

आदिवासीची ढाल करून पोलिसांच्या हत्या थांबवाव्या आणि दुर्गम भागात प्रशासनाला विकास करू द्यावा. राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा तर तो हाताळण्यासाठी मराठा समाज सक्षम आणि समर्थ आहे. त्यासाठी हिंसाचाराला दैवत मानणाऱ्यांच्या अनाहूत सल्ल्याची आम्हाला गरज नाही. हिंसाचारात आकंठ बुडालेल्या खंडणीखोर नक्षलवाद्यांची मराठा समाजाला सल्ला देण्याची लायकी नाही, असे सडेतोड उत्तर मराठा युवा संघाचे उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह दत्ताजी शिर्के, कुशांक गायकवाड, महेश अहिरराव आदींनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...