आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाचा परिणाम:बैलजोडीची संख्या घटली; भंडाऱ्यातील सातोना गावात भरला ट्रॅक्टरचा पोळा, गावातून काढली मिरवणूक

प्रशांत देसाई | भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बळीराजाचा सुखदुःखाचा सोबती सर्जा-राजाच्या उत्साहाचा सण म्हणून पोळा ओळखला जातो. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आता ट्रॅक्टरने शेती कसली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बैलजोडीची संख्या कमी होऊन आता ट्रॅक्टरची संख्या वाढत आहे. भंडारा जिल्ह्यातील सातोना येथे शुक्रवारी ग्रामस्थांनी बैलजोडी आणि ट्रॅक्टरचा पोळा भरवला. यात बैलजोडीच्या तुलनेत ट्रॅक्टरची संख्या अधिक दिसून आली. पहिल्यांदाच सातोना येथे ट्रॅक्टरचा पोळा भरवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून येत होता.

जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांकडे असलेल्या बैलजोडीचा गौरव करता यावा म्हणून देशभरात पोळा सण उत्साहात साजरा होतो. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. एकेकाळी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी असायची. मात्र, आता बैलजोडीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड बळीराजाने घालत ट्रॅक्टरने शेती कसायला सुरुवात केली आहे. बैलजोडीची रोडावत चाललेली संख्या आणि वाढत असलेली ट्रॅक्टरची संख्या, यामुळे पोळा या सणाचे महत्त्व कमी झाले. याचीच प्रचिती भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सातोना येथे बघायला मिळाली.

सातोना या गावातील सहयोग ग्रुपने या ट्रॅक्टरच्या आधुनिक पोळ्याची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे, या पोळ्यात शेतकऱ्यांकडे असलेल्या केवळ २२ बैलजोडी आल्या. तर, ५० च्या घरात ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरसह उपस्थित झाले होते. गावाच्या बसस्थानक चौकात सहयोग ग्रुपतर्फे आयोजित ट्रॅक्टरचा आधुनिक पोळा बघण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचीही उपस्थिती होती. ग्रामस्थांचा उत्साह वाढावा यासाठी डीजे, ढोलताशा : सुमारे ३५०० लोकवस्तीचे सातोना हे गाव. एकेकाळी या गावात शेतकऱ्यांकडे शंभरावर बैलजोड्या होत्या. मात्र, कलानुरूप आता बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे सातोना या गावातील शेतकऱ्यांकडे असलेल्या बैलजोडीची संख्याही निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. आधुनिक ट्रॅक्टरच्या पोळ्यात सहभागी झालेल्या ट्रॅक्टर चालक-मालक आणि ग्रामस्थांचा उत्साह वाढावा यासाठी ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर गावातील युवा थिरकले. त्यानंतर सर्व ट्रॅक्टरची एका लाईनमध्ये गावातील हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून गावातून मिरवणूक काढण्यात आली.

नाना पटोले यांनी सुकळी गावात ग्रामस्थांसोबत साजरा केला पोळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली तालुक्यातील सुकळी या त्यांच्या गावात बैलपोळा मोठ्या थाटात साजरा केला. गावातील मुख्य चौकात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा भरवण्यात आला. नाना पटोले सहकुटुंब प्रत्येक सण मूळ गाव सुकळी येथे उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत साजरा करत असतात. शुक्रवारी पोळा सणानिमित्त नाना पटोले यांनी पोळ्यात उपस्थित सर्व बैलजोडी मालकांच्या भेटी घेत बैलजोडींचे पूजन केले. त्यानंतर गावातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेतला.

तान्हा पोळ्यासाठी तयार केला अडीच लाखांचा लाकडी बैल प्रतिनिधी | नागपूर नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळा उत्साहाने साजरा होतो. यात मुले लाकडी बैल घेऊन येतात. नागपुरात कलाकार लाकडी बैल तयार करून विक्रीला आणतात. महाल आणि इतवारी भागात ही दुकाने सजलेली अाहे.

विशेष म्हणजे एका कलाकाराने चक्क अडीच लाखांचा लाकडी बैल विक्रीसाठी आणला. अखंड लाकडापासून हा नंदीबैल तयार केला. यात एकाच लाकडावर कोरीव काम केले आहे. कलाकाराने खूप बारकाईने कलाकुसर केल्यामुळे अगदी हुबेहूब वाटावा असा हा पाच फूट उंचीचा नंदीबैल आहे. पोळ्याच्या दिवशी पोळ्यात आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. शनिवारी तान्हा पोळा आहे. तान्हा पोळ्यात बच्चेकंपनी नंदीबैल घेऊन जातात. अशावेळी आकर्षक नंदीबैलाला विशेष बक्षिसे दिली जातात.

लाकडी नंदीबैल ठरणार आकर्षण : विदर्भात लाकडाच्या बैलांचा पोळा म्हणजेच तान्हा पोळ्याला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये लहान मुले नंदीबैल घेऊन तान्हा पोळ्यात दाखल होतात. बक्षीसही मिळवतात. त्यांच्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र हा नंदीबैल या वर्षीचे आकर्षण ठरेल, असे चित्र आहे. उत्तम कोरीव कामामुळे बैल जिवंत वाटतो. अगदी ५०० रुपयांपासून लाखांपर्यंत लाकडी बैल विकायला येतात. जिवंत बैलापेक्षा लाकडी बैलाची किंमत दुप्पटीने असली तरी घेणारे असतात. कारागीर सुभाष बनडेवार यांनी हा बैल तयार केला आहे.

बातम्या आणखी आहेत...