आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी सोडले घर:घरातून निघून गेलेल्या मुलीपरत यायलाच तयार नाहीत, घरचे मारहाण करतात हे दिले कारण

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर शहरामधील कपील नगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. या शेजारी राहणाऱ्या या दोन्ही मुली घरी परतायलाच तयार नसल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या या मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून उद्या सोमवारी बालकल्याण समिती समोर सादर केले जाणार आहे. मुलींनी तिथेही घरी जाण्यास नकार दिल्यास त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याशिवाय पर्याय नाही अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रभात पाटील यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी ४० वर्षीय फिर्यादीची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी टीव्ही पाहायला जाते असे सांगून घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही मुलगी परत न आल्याने तिची आई शेजारी विचारण्यासाठी गेली असता शेजारच्याची १५ वर्षीय मुलगीही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

यामधील दोन्ही मुलींची घरे शेजारी असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीजवळ ५०० तर १५ वर्षीय अल्पवयीन मुली जवळ १०० रुपये होते. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची आई कामानिमित्त हैदराबादला गेली होती. दरम्यान मुलगी घरून निघून गेली. आई परतल्यानंतर तिने शेजारी चौकशी केली असता त्यांचीही मुलगी निघून गेल्याचे समजले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींच्या घरची परिस्थिती खूपच बेताची आहे. घरून निघून गेल्यानंतर मुली प्रथम बर्डी येथील एका नातेवाइकाच्या घरी गेल्या. परंतु त्याने समजावून घरी परत जाण्यास सांगितल्यानंतर दोघीही बर्डी येथील एका मंदिरात गेल्या. १ सप्टेंबरचा दिवस व रात्र त्यांनी मंदिरात काढली. नंतर त्या फिरत-फिरत बेझनबाग मैदानात आल्या. त्या भागात काही ठिकाणी फिरून काम शाेधत होत्या. जवळ पैसे असल्याने चिप्स व फरसाण घेऊन दिवस काढत होत्या. बेझनबाग परिसरात असताना तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना फोन करू देण्याची विनंती करीत होत्या, असे सहायक पोलिस निरीक्षक प्रभात पाटील यांनी सांगितले.

पोलिसांना अशा सापडल्या मुली घरून निघून गेलेल्या या दोन्ही मुलींनी एका झोमॅटाे डिलिव्हरी बाॅयच्या मोबाइलवरून एका नातेवाइकाला १ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास फोन केला. पोलिसांनी सर्व नातेवाइकांना विचारणा केली असता त्या नातेवाइकाने झोमॅटो डिलिव्हरी बाॅयचा नंबर दिला. पोलिसांनी या डिलिव्हरी बाॅयला २ सप्टेंबरला फोन करून बोलावून घेतले. त्याला घेऊन पोलिस डेमो देण्यासाठी रात्री १० वाजता बेझनबाग येथे घेऊन गेले. पोलिस त्याला मुलींना फोन करण्यास सांगणार इतक्यात मैदानाच्या एका कोपऱ्यात मुली बसलेल्या दिसल्या. पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांना घरी सोडून देतो असे सांगताच मुलींना ठामपणे नकार दिला. आम्ही बाहेरच नोकरी वा काम करून राहू. परंतु घरी परत जाणार नाही असे सांगितल्याने त्यांना काटोल रोड येथील बालसुधारगृहात ठेवले. उद्या या मुलींना बालकल्याण समितीसमोर उपस्थित केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...