आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येतील राम मंदिरानंतर रा. स्व. संघाला कोणतेही आंदोलन करायचे नाही. “ज्ञानवापी’साठीही संघ आंदोलन उभारणार नाही, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गातील वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांना संघाच्या बदललेल्या भूमिकेचे आश्चर्य वाटत आहे. यासंदर्भात संघ अभ्यासक आणि विश्लेषक दिलीप देवधर यांच्याशी संपर्क साधला असता यापुढे संसद आणि न्यायपालिकेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची रा. स्व. संघाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी वाजपेयींच्या काळात संघ सत्ताधारी होता. आता मोदींच्या नेतृत्वात बहुमताने सत्ताधारी आहे आणि सत्ताधारी कधीच आंदोलने करीत नाहीत. येणारी २५ वर्षे संघ सत्ताधारी राहणार आहे आणि न्यायपालिका व संसदीय प्रणालीच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे देवधर म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सत्तेत असतानाच औरंगजेबी मशीद पाडून सोमनाथ मंदिर बांधले. त्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केले होते, याची आठवण देवधर यांनी करून दिली. म्हणून यापुढे रा. स्व. संघ कोणत्याही आंदोलनात उतरणार नाही. आंदोलने केली तरी ती हिंदू समाज करील, असे ते म्हणाले. संघ संस्थापक डाॅ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकरांनी ३८ वर्षे आंदोलनविरहित संघकार्य उभे केले. आम्ही संघ जोडण्यासाठी व रचनात्मक निर्मितीसाठी जन्माला घातलाय, विध्वंसासाठी नाही, असे म्हणत गुरुजींनी संघर्ष टाळले.
याउलट बाळासाहेब देवरस त्यांच्या २२ वर्षांत संघ गुरुजींच्या धोरणाच्या विरोधात वागले. त्यांनी आंदोलनातून संघ परिवाराला हिंदू समाजाच्या केंद्रस्थानी नेले. जयप्रकाश आंदोलन ते रामजन्मभूमी आंदोलन असा प्रवास देवरसांच्या काळात झाला. १९९४ नंतर संघ आंदाेलनात उतरला नाही. सरसंघचालक रज्जूभय्यांच्या काळात बेरजेतून संघाला सत्ताधारी केले. हा इतिहास पाहिला तर संघाच्या यापुढे आंदोलन न करण्याच्या घोषणेत आश्चर्य वाटण्याचे काहीएक कारण नाही.
सुदर्शन यांच्या कालखंडात संघ स्वत:च विघटित
सरसंघचालक कुप्प. सी सुदर्शन यांच्या कालखंडात संघ स्वत:च विघटित झाला. इगो, क्लॅशेसमुळे ब्रेक झाला. पण, सुदर्शनजींनी मुस्लिम समाजात इंद्रेशकुमार यांच्यामार्फत व्यासपीठ उभे केले. हिंदू समाजाप्रमाणे मुसलमानही विभागले हे शाेधले. अशरफ म्हणजे विदेशी मूळचे, अजलफ म्हणजे बहुजन, अरझल म्हणजे अस्पृश्य मुसलमान समाज आहे. यातील अजलफ म्हणजे बहुजन, अरझल म्हणजे अस्पृश्य मुसलमान आणि संघामध्ये सिक्रेट बाँड तयार झाला आहे. म्हणून मोजके मुसलमान वगळता इतरांचा विरोध होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.