आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • The Schedule Of Irrigation Projects In The State Will Be Delayed Throughout The Year And The Cost Of The Projects Is Likely To Go Up By 10 Per Cent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फटका:राज्यातील सिंचन प्रकल्पांचे वेळापत्रक वर्षभर रखडणार, प्रकल्पांच्या किमतीही १० टक्क्यांनी वाढण्याचा धोका

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठ महिने मजूर मिळणे कठीण, प्रकल्पांवर होणार परिणाम

(रमाकांत दाणी)

कोरोना आपत्तीचा मोठा फटका राज्यातील शेकडो सिंचन प्रकल्पांच्या कामांना बसला असून कामे ठप्पच असल्याने सिंचन प्रकल्पांच्या कामांचे वेळापत्रक किमान एक वर्षाने पुढे जाण्याचा अंदाज आताच व्यक्त केला जात अाहे. प्रकल्पांचा कालावधी वाढून त्याची परिणती प्रकल्पांच्या किमती किमान १० टक्क्यांनी वाढतील, असे अंदाज जलसंपदा विभागात वर्तवले जात आहेत.

राज्यभरात सध्या जलसंपदा विभागाने २७८ प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत १ लाख कोटींच्या जवळपास आहे. त्यापैकी सर्वाधिक १०८ प्रकल्प विदर्भातील असून त्यांची उर्वरित किंमत ४० हजार ५०० कोटींच्या आसपास आहे. तापी खोरे महामंडळात १३ हजार कोटींची २९ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली अाहेत. कोकणात ९५०० कोटींचे ५२ प्रकल्प, गोदावरी मराठवाडा महामंडळाच्या अंतर्गत १७ हजार ४०० कोटी रुपये किमतीच्या ४९ प्रकल्पांची कामे, तर कृष्णा खोरेअंतर्गत १९ हजार ६०० कोटी रुपयांच्या ४० प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सिंचन प्रकल्पांसाठी १० हजार २३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या आपत्तीमुळे सारेच आर्थिक गणित बिघडले असून ३३ टक्केच निधी खर्च करायची परवानगी आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी तूर्तास ३ हजार कोटी रुपये उपलब्ध असले तरी जलसंपदा विभागाची समस्या वेगळी आहे.

सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी सर्वात उपयुक्त असणारा फेब्रुवारी ते जूनपर्यंतचा महत्त्वाचा कालावधी यंदा वाया गेला आहे. मागील दीड महिन्यापासून कामे ठप्प आहेत. आताही लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी मजूर उपलब्ध नाहीत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कामे सुरू होण्याची कुठलीही शक्यता नाही. दिवाळीनंतरच कामे सुरू होत असली तरी त्यातही अनेक अडचणी येतात. त्यामुळे कामांच्या दृष्टीने पूर्ण वर्षच वाया गेल्याची परिस्थिती आताच दिसत असल्याचे मत जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे यांनी व्यक्त केले. प्रकल्पांचा कार्यक्रम वर्षभराने पुढे गेला आहे. त्यामुळे किमतीही किमान दहा टक्क्यांनी वाढू शकतात, अशी भीतीही बेलसर दिव्य मराठीशी बोलताना या वेळी व्यक्त केली.

आठ महिने मजूर मिळणे कठीण

‘प्रकल्पांच्या कामांसाठी आणखी सहा-आठ महिने मजूर मिळणे कठीण जाईल. त्याचा परिणाम प्रकल्पांवर होणार आहे. सध्या बजेटमध्ये उपलब्ध होणारा ३ हजार कोटींचा निधी तरी खर्च होईल की नाही हा आमच्यापुढील प्रश्न आहे..’ अशी चिंता जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली. ‘सध्याचे लॉकडाऊन आणखी किती काळ चालते याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रकल्पांची कामे आणखी अनेक महिने रेंगाळणार हे निश्चित..’ असे चहल यांनी सांगितले.

७३ प्रकल्पांवर काम सुरू

मागील काही दिवसांच्या आढाव्यानंतर जलसंपदा विभागाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा योजनेतील प्रकल्प प्राधान्याने राबवण्याचे ठरवले आहे, असे चहल यांनी सांगितले. सध्या राज्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील २६ पैकी ९ प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्पांची किंमत साडेआठ हजार कोटींच्या घरात आहे, तर बळीराजा योजनेतील ९१ पैकी १८ प्रकल्प पूर्ण झाले असून ९५०० कोटी रुपये किमतीच्या ७३ प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.        

बातम्या आणखी आहेत...