आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. संभाजीराजे यांचा इशारा:मराठा आरक्षणावर राज्य सरकारने अधिवेशनात निर्णय घेतले नाही तर पुन्हा मूक आंदोलन

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक महिना झाला तरी अद्याप तोडगा निघाला नाही

राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात लगेचच धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर आम्हाला पुन्हा मूक आंदोलन करावे लागेल, असा सणसणीत इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक खासदार संभाजीराजे भोसले यांनी नागपुरात दिला. मराठा समाजाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त सोमवारी नागपुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत नागपूरचे राजे मुधोजीराजे भोसले आणि राजे संग्रामसिंह भोसले उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सध्या सुरू असलेल्या द्विदिवसीय पावसाळी अधिवेशनात हा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. येत्या काही दिवसांत राज्य सरकारने या प्रश्नावर नेमके काय करणार, हे जाहीर केले नाही तर आम्हाला मूक आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असाही इशारा राजेंनी दिला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून आम्ही मूक आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व प्रमुखांची भेट घेतली. त्या वेळी सरकारने या प्रश्नावर भूमिका मांडण्यासाठी २१ दिवसांचा वेळ मागितला. आम्ही एक महिन्याचा वेळ सरकारला दिला. मात्र आता एक महिन्याचा कालावधी संपायला आला तरीही महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर अद्यापही तोडगा काढलेला नाही आणि या प्रश्नावर भूमिका जाहीर केलेली नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

मराठा आरक्षण रद्द झाले त्याला जबाबदार कोण आहे? कुणाच्या चुका झाल्या? यावर चर्चा करण्यापेक्षा यातून मार्ग काढावा लागेल. याप्रश्नी केंद्र सरकारपुढे दोन पर्याय आहेत. एक तर मराठा आरक्षणाकरिता अध्यादेश काढावा किंवा घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करावा. दोन्ही पर्याय कठीण आहेत. पण हे करावे लागेल, असेही राजे म्हणाले. कोणत्याही प्रश्नावर मोर्चे काढणे, आंदोलन करणे हा सर्वांचे अधिकार आहे. पण कोरोनाच्या कठीण प्रसंगात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाला वेठीस धरून आंदोलन, मोर्चे काढू नका, असे आवाहन त्यांनी केले.

माझी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना विनंती आहे की, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी मिळून पंतप्रधान, राष्ट्रपती यांची भेट घ्यावी. लोकसभेत, राज्यसभेत या प्रश्नावर आवाज उठवावा, असे संभाजीराजे म्हणाले. एमपीएससीचा विद्यार्थी असलेला स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येला सर्वच सरकारे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. २,१८५ उमेदवारांची निवड झाल्यानंतरही नियुक्ती दिली जात नाही हा विषय गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...