आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘एक्सबीबी 1.16’ हा विषाणू पँडेमिक नसून ‘एंडेमिक’, यामुळे साथरोग पसरण्याचा धोका नाही

नागपूर / अतुल पेठकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताला सध्या तरी नव्या मोठ्या कोरोना लाटेचा धोका दिसत नाही, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथीचे व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.एक्सबीबी.१.१६ या ओमायक्राॅनचाच नातू म्हणावा अशा व्हेरियंटचे जानेवारी ते मार्चमध्ये सुमारे ४०० ते ४५० नमुने तपासण्यात आले. त्यात पाॅझिटिव्ह आल्याने केंद्राने सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला. पण, त्याने पॅनिक होण्याची गरज नाही. कारण यामुळे इस्पितळात दाखल होण्याचे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य आहे. हा विषाणू “व्हेरियंट आॅफ कन्सर्न’ म्हणजे धोकादायक नसून “व्हेरियंट अंडर माॅनिटरिंग’ म्हणजे धोकादायक आहे का हे पाहण्यासाठी निरीक्षणाखाली असलेल्या गटामध्ये मोडतो, असे गंगाखेडकर यांनी सांगितले.

१६ महिन्यांपासून एकही नवा व्हेरियंट नाही
नवा व्हेरियंट पँडेमिक नसून एंडेमिक आहे. म्हणजे अजूनही एकही व्हॅक्सिन घेतलेले नाही किंवा प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशांना याचा सौम्य संसर्ग होताे. पँडेमिक नसल्याने एकाच वेळी देशभर त्याचा संसर्ग झाल्याचे दिसणार नाही. ओमायक्राॅनच्या पोटजातीतील “बीए.२’ यापासून एका विषाणूचा अर्धा तुकडा आणि दुसऱ्या विषाणूचा थोडा तुकडा असा हा “रिकाॅम्बिनंट’ विषाणू आहे. त्यामुळे झपाट्याने संसर्ग वाढणार नाही. पूर्वी दरमहा वुहान, अल्फा, बीटा, डेल्टा असे नवनवीन व्हेरियंट दिसायचे. आता गेल्या १६ महिन्यांपासून एकही नवा व्हेरियंट आलेला नाही, याकडे डाॅ. गंगाखेडकर यांनी लक्ष वेधले.

हायब्रीड इम्युनिटीचे संरक्षण
नोव्हेंबर २०२१ मध्ये द. आफ्रिकेत ओमायक्राॅन दिसला. त्यानंतर “व्हेरियंट आॅफ कन्सर्न’ धोकादायक विषाणू दिसलेला नाही. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची नावे ठरलेली आहेत. त्याचप्रमाणे नवीन येणाऱ्या विषाणूंचीही नावे ठरलेली आहेत. नवीन विषाणू आल्यास “पाय’ येईल. आपल्याकडे व्हॅक्सिन व संसर्गाची “हायब्रीड इम्युनिटी’ िवकसित झालेली आहे. भारतीयांना त्याचे संरक्षण आहे.

सर्दी, खोकला झाल्यास मुलांना तूर्त शाळेत पाठवू नका
“हायब्रीड इम्युनिटी’ रुग्णालयात भरती होणे कमी करते. तीव्र काेरोना व मृत्यूची शक्यता कमी करते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. बूस्टर डोस अवश्य घ्या. अतिजोखमीच्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी बंद खोली वा वातानुकूलित खोलीत न चुकता मास्क घालावा. मुलांना सर्दी वा खोकला झाल्यास शाळेत पाठवू नका. कारण मुले एकमेकांशी खेळतात, घरी येतात. त्यामुळे घरच्यांनाही संसर्ग होऊ शकतो. नोकरदारांनीही सर्दी, खोकला असल्यास मास्क घालावा.

नव्या व्हेरियंटमुळे लागण किती होते आहे हे महत्त्वाचे नाही, तर रुग्णालयात भरती किती होतात, किती मृत्यू होतात हे महत्त्वाचे. संसर्ग व मृत्यू वाढत गेल्यास मात्र धोका उद्भवू शकतो. त्यामुळे ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता उगाच घाबरून न जाता, तसेच दिरंगाई न करता लसीकरण करून कोरोना नियमांचे पालन करावे, असे गंगाखेडकर म्हणाले.

चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ
पूर्वी सौम्य लक्षणे असलेले तपासणी करत नव्हते. आता “एच-१ एच-३’ या तत्सम आजारामुळे जोखीम नको म्हणून लोक तपासणी करतात. त्यावेळी कोरोना चाचणी केली जाते. सध्या नव्याने चाचण्या वाढल्यामुळे रुग्णवाढ दिसत आहे. पण, ही रुग्णवाढ कायम राहणार नाही, असे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.