आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चवताळलेल्या रानटी हत्तीने केला तरुणांचा पाठलाग:गावाच्या दिशेने काढला पळ; तरुणांची उडाली तारांबळ

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमधून एक घटना समोर आली आहे. चवताळलेल्या रानटी हत्तीने तरुणांचा पाठलाग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनने सर्व तरुणांची तारांबळ उडाली असून, त्यांनी गावाच्या दिशेने पळ काढला. ग्रामस्थांनी हत्तींच्या कळपाच्या जवळ जावू नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे.

रविवार 27 नोव्हेंबरपासून 23 रानटी हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही गावालगतच्या जंगलात थांबला होता. शुक्रवारी पहाटे हा कळप शिवणी मोगरा गावाकडून पेंढरीकडे एका शेतातून निघाला असताना गावातील काही अतिउत्साही तरुणांनी त्यांच्या जवळ धावत जात फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी चवताळलेल्या एका महाकाय हत्तीने या तरुणांचा पाठलाग केला.

प्रकार नेमका काय?

अनेक वर्षांच्या कालखंडानंतर भंडारा जिल्ह्यांत रविवारी मध्यरात्री रानटी हत्तींच्या कळपाचे आगमन झाले. रानटी हत्तींनी शेतात प्रवेश करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. ऑगस्ट महिन्यापासून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या तब्बल 23 रानटी हत्तींचा कळप भंडाऱ्यातील साकोली तालुक्याच्या महालगाव येथील जंगलात मुक्कामी होता. सानगडी वनक्षेत्रातील झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव गावाशेजारील शेतशिवारात रानटी हत्तींनी शेतातील धानाच्या पुंजणांची नासधूस केली.

हत्तीच्या हल्ल्यात एका वक्तीचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून गोंदियात वास्तव्य असलेल्या हत्तींचा कळप नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात यावा, यासाठी वनाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रानटी हत्तींनी भंडाऱ्याच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली होती. गोंदियात हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महालगाव, वडद आणि शिपडी या गावातील लोकांनी हत्तींच्या कळपाजवळ जाऊ नये, यासाठी वनकर्मचारी गावात तैनात केले होते.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक राठोड, वनपरीक्षेत्राधिकारी संजय मेंढे, तहसीलदार कुंभरे व वनविभाग तथा महसूल विभागाची चमू सानगडी येथे तळ ठोकून होती. महसूल व वनविभाग नुकसानीचे पंचनामे करीत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नरत आहे. हत्तींच्या आगमनामुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, हत्ती रात्रीच नुकसान करतात आणि दिवसा त्यांचा थांगपत्ता लागत नाही. यामुळे वनविभागापुढे मोठे आव्हान आहे. शेतात खरीप पिकांसह आता नव्याने रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...