आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:पोलिस भरतीच्या सरावासाठी क्रीडांगण नव्हते, युवकांनी श्रमदान करत तयार केले मैदान

नागपूर / अतुल पेठकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीच्या भीमशक्ती युवा संघटनेच्या तरुणांच्या कामाचे कौतुक

पोलिस भरतीच्या सरावासाठी गावात क्रीडांगण नव्हते. नगर परिषदेला अर्ज विनंत्या करूनही उपयोग झाला नाही. त्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. शेवटी गावातील युवा संघटनेच्या मुलांनी स्वत:च श्रमदान करत गावातील दोन एकरचे मैदान स्वच्छ केले आणि सराव सुरू केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील भीमशक्ती युवा संघटनेने केलेल्या या कामाचे आता कौतुक होत आहे.

गृह विभागाने पोलिस भरतीची घोषणा करताच सावली येथील युवकांमध्ये आनंद पसरला. परंतु, सावली शहरात क्रीडांगणच नसल्याने शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र यावर भीमशक्ती युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी एकत्र येत तोडगा काढत स्वत:च मैदान तयार करण्याचे ठरवले. शहरातील योगी नारायण बाबा मठाच्या मागे दोन एकर जागा होती. मुलांनी रडगाणे न गाता हातात कुदळ, फावडे घेत मैदान समतल केले. कुऱ्हाडीने वाढलेली झुडपे तोडली. पाहता पाहता मैदान तयार झाले. आता तिथे मुले पोलिस भरतीसाठीच्या शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करत आहेत.

सावली हे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र येथे क्रीडांगण नाही. तालुका क्रीडांगण मुख्यालयापासून पाच ते सहा किमी. अंतरावर आहे. त्यातही तिथे पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नाही. म्हणून भीमशक्ती युवा संघटनेने अनेकदा निवेदन देऊन नगर पंचायतीचे क्रीडांगण तयार करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्यामुळे संघटनेचे अंतबोध बोरकर, प्रफुल्ल बोरकर, गब्बर दुधे यांनी वर्गणी गोळा करत मैदान तयार केले. तिथे रनिंग ट्रॅक, लांब उडीचे मैदान तयार केले आहे. या उपक्रमात भीमशक्ती युवा संघटनेचे अंकित भडके, पुष्पकांत डोंगरे, प्रफुल्ल गोंगले, प्रशांत नारनवरे, बादल खोब्रागडे, चांदणी मडावी, अक्षदा दुधे, नितेश बोरकर, अक्षय बारसागडे, निर्वेद वाळके, प्रणित बोरकर, मैत्रेय सोमकुवर, चंदन डोहणे, साहील वासाडे, समीर देशमुख, विशाल रायपुरे आदींनी परिश्रम घेतले.

संघटनेचे सात सदस्य सैन्यात
भीमशक्ती युवा संघटनेचे तीन सदस्य मागील तीन वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अन्य युवकांनी पोलिस तसेच सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा चार जणांची सैन्य दलात निवड झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser