आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतांचा पुरवठा:यंदा नागपूर विभागामध्ये प्रत्यक्ष 6 लाख 23 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा होणार

नागपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीन व इतर पिकांसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाण्यांचा वापर करावा. पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी येथे केले आहे. मागील तीन वर्षांतील खतांची मागणी लक्षात घेवून नियोजन करण्यात आले आहे. यंदा ५ लाख ८३ हजार मेट्रिक टन सरासरी मागणी असून प्रत्यक्ष ६ लाख २३ हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा होणार आहे.

नागपूर विभागात १९ लाख ५८ हजार ५६६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कापूस, सोयाबीन, तूर, भात, इतर बियाणे व खते उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विभागात खरीप पिकाचे नियोजन करण्यात आले असून ७५ ते १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर पिकांची पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहसंचालकांनी केले आहे. विभागात सरासरी ५१ लाख हेक्टरपैकी १९ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने कापूस ६ लाख २० हजार हेक्टर, सोयाबीन ३ लाख २ हजार ६५० हेक्टर, तूर १ लाख ९७ हजार हेक्टर, भात ८ लाख ३० हजार तर इतर पिकाखाली ८ हजार ७१६ हेक्टरचा समावेश आहे. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे या पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असून त्यादृष्टीने बियाण्यांचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे खरेदी करावीत. तसेच बियाण्यांच्या पिशवीवरील प्रमाणपत्र न काढता खालच्या बाजूने बियाणे काढावे. काही बियाणे उगवण क्षमता तपासण्यासाठी शिल्लक ठेवावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...