आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवाळी सणाच्या मुहूर्तावर परंपरेनुसार शेळ्या मेंढ्यांच्या आंघोळीसाठी तलावातील खोल पाण्यात उतरलेल्या तीन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जंगलातील तलावात दिवाळीच्या दिवशी शनिवारला घडली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
मधुकर नीलकंठ मेश्राम (४५), सुधाकर नीलकंठ मेश्राम (४३), प्रदिप नीलकंठ मेश्राम (३९) रा. पुयार अशी मृत सख्ख्या भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक तिन्ही भावंड तुषार मधुकर मेश्राम (13) नामक बालकाला घेवुन मालकीच्या अंदाजे शंभर शेळ्या मेंढ्यांच्या आंघोळीसाठी गावातील जंगलातील तलावाकडे गेलेहोते. यावेळी प्रारंभी मृत मधुकर हा काही शेळ्या मेंढ्यांच्या आंघोळीसाठी तलावातील खोल पाण्यात उतरला मात्र, शेळ्या मेंढ्या पाण्याबाहेर येत होत्या, त्यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने मधुकर पाण्यात बुडत असल्याचे भाऊ सुधाकरला दिसला.
त्यामुळे भावाला वाचविण्यासाठी दुसरा भाऊ सुधाकर याने पाण्यात उडी घेतली. मात्र, तो देखील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्यामुळे तिसरा भाऊ प्रदिपने दोन्ही भावांना पाण्याबाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांच्या बचावात तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी घटनास्थळावर हजर तुषारने सदर दुर्घटनेची मोबाइलवरुन कुटुंबियांना माहिती दिली. सदर माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी धाव घेत गावातीलच काही ढ़िवर बांधवांच्या मदतीने तिन्ही मृतदेह तलावातील पाण्यातून बाहेर काढले.
यावेळी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच येथील सहाय्यक पोलिस निरिक्षण चहान्दे यांच्यासह पोलिस नाइक दुर्योधन वकेकार, पोलिस अंमलदार संदीप रोकडे, अनिल साबळे, सैनिक दशरथ सतिबावने, हुसेन नखाते आदी पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थाळी जावुन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. दरम्यान दिवाळीच्या शुभ पर्वावर पुयार गावात एका गरिब कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण पुयार गावात शोककळा पसरली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.