आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:राज्यातील तुरुंगात फाशीच्या शिक्षेच्या तीन महिला कैदी; येरवड्यात दोन, तर नागपूरमध्ये एक कैदी

नागपूर / अतुल पेठकर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील शबनम या महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनमने प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. मथुरा इथल्या तुरुंगात तिला फाशी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तुरुंगात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या महिला कैद्यांची माहिती घेतली असता फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तीन महिला कैदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील दोन कैदी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असून एक महिला कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दिली.

एकीकडे अल्पवयीन मुली, महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने दोषी आरोपींना फाशी देण्याची आग्रही मागणी समाजातील सर्व स्तरातून केली जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात फाशीच्या कैद्यांची संख्या झपाट्याने घटू लागली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले ११ पुरुष आणि १ महिला असे १२ कैदी आहेत. तर येरवडा मध्यवर्ती कारागृहात एकूण २४ कैदी असून त्यापैकी २ महिला कैदी आहेत.

फाशीची शिक्षा झालेले बहुतांश कैदी येरवडा आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भाेगत आहेत. या दोनच कारागृहात कैद्यांना फाशी देण्याची सोय आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक कारागृहात देखील फाशीचे कैदी ठेवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला सात वर्षांपूर्वी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेननला नागपूर कारागृहात फाशीची शिक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर राज्यात एकाही गुन्ह्यातील आरोपीला फाशीच्या शिक्षा दिलेली नाही.

फाशीची शिक्षा झालेले कैदी शिक्षा माफ करण्यासाठी प्रथम न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात. तेथे शिक्षा माफ न झाल्यास नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करतात. पण राष्ट्रपतींकडून फाशीच्या शिक्षेचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर वकिलांकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करून अनेकजण फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न करतात. यामुळे फाशीच्या कैद्यांची संख्या कमी झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.

कैद्यांच्या कायदेशीर सल्ल्यासाठी ‘एनएलयू’
फाशीच्या कैद्यांच्या मदतीसाठी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे (एनएलयू) पथक काम करते. फाशीच्या कैद्यांना कायदेशीर सल्ला देण्याचे काम ‘एनएलयू’ करत असते. ‘एनएलयू’चे पथक प्रसंगी कारागृहात येऊन फाशीच्या कैद्यांची भेट घेत माहिती जाणून घेते.