आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागभीड तालुक्यातील जंगलात मृतावस्थेत आढळला वाघ:रानकुत्र्यांसोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाल्याची शक्यता

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील किटाळी गावालगतच्या जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वाघाचे आणि रानकुत्र्यांच्या पायाचे ठसे आढळले. त्यामुळे वाघाचा मृत्यू अन्य एखाद्या वाघासोबत किंवा रानकुत्र्यांसोबत झालेल्या झुंझित झाल्याची शक्यता वनखात्याने वर्तवली आहे. मृत वाघ अंदाजे २ ते २.५ वर्षांचा असून वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोस्टमार्टमनंतर घटनास्थळीच वाघावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांत वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना परत वाघ ठार झाल्याची घटना घडल्याने चिंतेचे वातावरण आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात ४ डिसेंबर रोजी वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.

दोनच दिवसांपूर्वी १ डिसेंबर रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी कक्ष क्र. १८९ मध्ये सुमारे ६ ते ७ महिन्यांचा एक मादी बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. या मादी बछड्याचा मृत्यू इतर नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे शरीरावरील खुणा तसेच घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून आले होते. या चारही बछड्यांना नर वाघाने ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज फिल्ड डायरेक्टर जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला होता.

वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार गुरूवार १ डिसेंबर रोजी कंपार्टमेंट क्रमांक २६५ मध्ये ३-४ महिने वयाची चार वाघांची पिल्ले दिसली. ३० नोव्हेंबर रोजी टी-७५ या वाघीणीचा कुजलेला मृतदेह याच परिसरात आढळला होता. तेव्हापासून आरएफओ शिवनी पीआरटी सदस्यांसह कर्मचारी शोध पथक या बछड्यांवर लक्ष ठेवून होते.

शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी त्याच परिसरात एक नर वाघ आढळून आला होता. शनिवार ३ रोजी शोधा दरम्यान शोध पथकाला वाघाच्या चारही पिल्लांचे (२ नर आणि २ मादी) मृतदेह आढळून आले. आणि परिसरामध्ये नर वाघाचे अस्तित्व दिसून आले.

चारही मृतदेह चाव्याच्या जखमांसह सापडले आहेत. आणि ते नर वाघाने मारले असल्याचे उघड आहे. त्याच परिसरात २ नर आणि एका दुसऱ्या मादीची उपस्थिती असल्याने आईची ओळख पटलेली नाही. कॅमेरा ट्रॅप्स लावून आणि क्षेत्रीय कर्मचारी तैनात करून परागंदा वाघांच्या उपस्थितीसाठी आणि हालचालीसाठी परिसरात आणखी सखोल निरीक्षण सुरू ठेवण्यात येईल असे रामगावकर यांनी सांगितले.

वाघीण आढळली मृतावस्थेत

दुसऱ्या घटनेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात गुरूवारी एक वाघीण मृतावस्थेत आढळली. मृत वाघीण अंदाजे १४ ते १५ वर्षांची होती. तिचे अवयव व कातडी कुजलेली आढळून आली.

बातम्या आणखी आहेत...