आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयावह!:महिनाभरात पांजरी लोधी गावात दुसऱ्यांदा दिसला वाघ; शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात वाघांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी वाढली असताना जिल्ह्यातही वाघांचा आकडा फुगला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात वाघांचे दर्शन हमखास होत आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. नागपूरपासून 20 किमी असलेल्या बुटीबोरी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पांजरी लोधी गावात महिनाभरात दुसऱ्यांदा वाघ दिसल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या वाघाने पशुधनावरही हल्ला केला आहे. यापूर्वी 25 जुलै रोजी वाघ दिसला होता.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची तपासणी केली असता वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आले. पांजरी लोधी येथील लीलाधर चंद्रभान मोडक यांची शेती जंगल क्षेत्राला लागून आहे. त्यांच्या शेतातून वाघ पलिकडे गेला. त्याने त्यांच्या पशुधनावरही हल्ला केला. फक्त जंगलाला लागून असलेल्या शेतीत वाघ दिसून आलेला आहे. इतर ठिकाणी त्रास नाही असे वनविभागाने सांगितले. मोडक यांचा अर्ज घेण्यात आलेला आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. परिसरात वनविभागाची टीम कार्यरत असून कॅमेरे लावण्यात आलेले आहे. गावात महिती देण्यात आलेली आहे. शुक्रवारपासून पथक गस्त करील आणि जनजागृती करेल असे वनविभागाने सांगितले.

यापूर्वी 25 जुलै रोजी पांजरी लोधी गावापासून एक किमीवर जंगल परिसरात जि. प. प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक वाघ बछड्यासह दिसला होता. या वाघाने एक गवा तसेच पाळीव जनावरांची शिकार केली होती. या संदर्भात मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्याशी संपर्क साधला असता या परिसरात वाघ बाहेरून आला नसून तिथे वाघ असल्याचे सांगितले.

बोर ते उमरेड कऱ्हांडला आणि बोर ते ताडोबा हा वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग आहे. हा जंगल परिसर हिंगणा वनपरिक्षेत्रात येतो. त्यामुळे तिथे वाघासह इतरही वन्यप्राण्यांचा वावर आहे. मानवी वस्ती हळूहळू जंगलाकडे सरकत असल्याचा हा परिणाम आहे. लोकांनी कुठल्याही कारणास्तव एकट्याने जंगलात जाऊ नये. गरज भासल्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जावे, असे आवाहन कुंदन हाते यांनी केले आहे.

यापूर्वी मिहानमधील इन्फोसिसजवळ शहराच्या वेशीवर आलेल्या वाघामुळे शेतकऱ्यांमध्येच नव्हे तर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते. यापूर्वी 9 डिसेंबर 2019 मध्ये मिहान परिसरात वाघ दिसला होता. हा वाघ नंतर बोर राखीव व्याघ्र प्रकल्पाकडे निघून गेला होता. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या परिसरात वाघ व इतर वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्याच्या घटना वारंवार घडतात.

बातम्या आणखी आहेत...