आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदियाच्या नवेझरीत वाघाची दहशत:ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण; वनविभागाचे गस्ती पथक गावात

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्या पाठोपाठ आता गोंदीया जिल्ह्यातही वाघाची दहशत आहे. गडचिरोली जिल्ह्यात 40 च्या वर वाघ आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात 100 च्यावर वाघ आहेत. गोंदिया जिल्ह्यातही वाघांचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघाचा शोध घेऊन त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे गस्ती पथक गावात दाखल झाले आहे. जंगलात वा शेतात जायचे असल्यास आधी वनविभागाला कळवावे. एकट्या दुकट्याने जंगलात जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.

तिरोडा तालुक्यातील जंगलव्याप्त नवेझरी गावात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावाला लागून व्याघ्रप्रकल्प असल्यामुळे तेथील वन्यजीवांचा नेहमीच गावाच्या आजूबाजूला वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असून अनेकांना वाघ दिसल्याचे लोक सांगत आहे. सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे पथक गावात दाखल झाले असून गस्त वाढवण्यात आली आहे.

वाघाच्या दहशतीमुळे सायंकाळ होताच परिसरात शुकशुकाट दिसून येतो. सायंकाळी वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे गावात कर्फ्यू लागल्यासारखे वातावरण आहे. दरम्यान, नवेझरी परिसरात वाघ असल्याची माहिती मिळाली असून त्याआधारे वन विभागाचे पथक गावात पोहोचले आहे. वाघ केवळ रस्ता ओलांडून गेला असल्याची माहिती असून वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे येथील वनपरिक्षेत्राधिकारी आर. जी. मून यांनी सांगितले.

तिरोडा तालुक्याचा दक्षिण भाग जंगलव्याप्त आहे. गावाला लागूनच व्याघ्रप्रकल्प असल्याने या परिसरात नेहमी वन्यजीवांचा वावर असतो. यापूर्वी वाघ आणि बिबट्यांनी या परिसरात धुमाकूळ घातला होता. सध्या धान कापणी आणि मळणीचे काम सुरू असल्यामुळे शेतकरी शेतात असतात. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाचे दर्शन होत असून रात्रीला वाघाच्या डरकाळ्यादेखील ऐकू येतात. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात कोणी ना कोणी मृत्यूमुखी पडले नाही असा दिवस जात नाही.

बातम्या आणखी आहेत...