आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान हे समृद्धी महामार्गावर सुमारे दहा किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मोदींच्या दौऱ्यासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मोंदीचा दौरा असलेल्या भागातील काही ठिकाणची रस्ते वाहतूक शनिवारपासूनच वळविण्यात आल्याने नागरिकांना फेरा घेऊन जावे लागत आहे.
विमानतळाकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथून फक्त विमान प्रवास करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. या शिवाय मोर्चा टी-पाॅइंटकडून सिव्हिल लाईनकडे जाणारा रस्ताही सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सीमा 4 तासांसाठी सील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने रविवारी शहराच्या सीमा 4 तासांसाठी सील करण्यात येतील. विविध यंत्रणांचे जवळपास ४ हजार अधिकारी जवान सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एनएसजी आणि फोर्स वनच्या जवानांचे पथक देखील पोहोचले आहे.
पंतप्रधानांचा उद्या असा असेल प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळ ते नागपूर रेल्वे स्थानकांपर्यंत रस्त्याने फ्रीडम पार्क ते खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने आणि तेथून परत समृद्धी महामार्गावर रस्त्याने प्रवास करणार आहेत. सुमारे तीन तास मोदी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या कालावधीत शहरातील सर्व सीमा सिल करण्यात येणार आहेत.. तर, वंदे भारत ट्रेनला मोदी हिरवा झेंडा दाखवणार असल्याने रेल्वे स्थानकाचे मुख्य द्वार प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकावर जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात ते अकरा या वेळेत संत्रा मार्केट येथील पूर्वेकडील मार्गाचा वापर सुरू ठेवण्यात येणार आहे
सभेच्या ठिकाणी १ हजार जवान
१०० अधिकारी आणि १ हजार ४०० कर्मचारी रस्ते मार्गावरच तैनात करण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणी १ हजार जवान तैनात असतील. एक अतिरिक्त आयुक्त, १५ आयुक्त, २५ सहाय्यक आयुक्त आणि १ हजार कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यातून मागविण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजी महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक दर्जाचे नऊ अधिकारी नागपुरात दाखल झाले आहेत. मुंबईतील गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली फोर्स वनच्या १५० जवानांनीही मोर्चा सांभाळला आहे. पंतप्रधानांच्या येण्यापूर्वीच नागपुरात अनेक रस्त्यांची सुधारणा, अनेक ठिकाणी रंगरंगोटीचे कामही करण्यात येते आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.