आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकधी नवीन अधिवास शोधण्यासाठी, कधी हद्द प्रस्थापित करण्यासाठी तर कधी मादीची ओढ किंवा अन्न आणि पाण्याच्या शोधात वाघ भटकंती करीत असतात. पण, एखाद्या वाघाने एका वर्षातच ३ हजार किलोमीटरचा पल्ला गाठल्याचे उदाहरण देशातच नाही तर संपूर्ण जगात विरळ आहे. हा विक्रम नोंदवला आहे विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या वाघाने. यामुळे सध्या वन्यप्रेमी आणि पर्यटकांमध्ये तो "वॉकर' या नावाने ओळखला जातो.
३ हजार किमी अंतर पार करणारा हा "वॉकर' फक्त ३ वर्षांचा आहे. आईपासून वेगळा झाल्यापासून त्याच्या भटकंतीस सुरुवात झाली. वन विभागाने लावलेल्या कॉलर आयडी टॅगमुळे २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यापासून त्याच्या प्रवासास सुरुवात झाली. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यापासून भटकत तो वर्षभरातच ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत पोहोचला. रेडिओ कॉलरच्या माध्यमातून त्याची भटकंती मोजली असता ३ हजार किमीचा प्रवास पुढे आला. विशेष म्हणजे, एकाच क्षेत्रात ४ ते ४ पेक्षा जास्त दिवस न राहता तो विविध ठिकाणी भटकत राहिला. ज्ञानगंगा अभयारण्यात भक्ष्याची कमतरता नसतानाही त्याचे अजिंठ्यात जाण्याचे गूढ अभ्यासकांना अजून उकललेले नाही.
रेडिओ कॉलरची बॅटरी संपेपर्यंत झाली प्रवासाची नोंद
- वॉकर वाघाच्या रेडिओ कॉलरची बॅटरी १३ महिन्यांनंतर म्हणजे २८ मार्च २०२० ला संपली. तोपर्यंतच्या १३ महिन्यांत त्याने ३,०१७ किमी अंतर कापल्याची नोंद झाली. प्रदेश आणि जोडीदाराच्या शोधात देशातील कोणत्याही वाघाने कापलेले हे सर्वात मोठे अंतर आहे.
- बॅटरीच्या समस्या व आगामी काळात कॉलर गळ्यात घट्ट होण्याचा धोका लक्षात घेता ड्रॉप-ऑफ वापरून त्याची कॉलर दूरस्थपणे काढण्यात आली. वॉकर ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात असताना ही कॉलर काढण्यात आली.
काॅलर आयडी टॅगमुळे भ्रमंतीची नोंद
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने यापूर्वी ताडोबा अंधारीतील ५ वाघांना १९ ऑक्टोबर २०१४ रोजी काॅलर आयडी टॅग लावला होता. तो १९ मार्च २०१६ रोजी काढून टाकण्यात आला. त्यानंतर १५ सप्टेंबर २०१५ रोजी २ वाघांना काॅलर आयडी लावण्यात आला. परंतु हा प्रयोग फसल्यानंतर २५ नोव्हेंबर २०१५ रोजी नव्याने पुन्हा लावण्यात आला. त्यातही बिघाड झाल्यानंतर १८ मार्च २०१६ रोजी परत नवा लावण्यात आला. मात्र १८ एप्रिल २०१६ ला तोही बिघडला. वाघांचा प्रवास कळावा म्हणून १७ मार्च २०१६ रोजी आणखी १५ वाघांना काॅलर आयडी लावण्यात आला.
हे जगातील विरळे उदाहरण
वाघांच्या प्रवासाच्या अनेक नोंदी आहेत. परंतु, एवढ्या कमी कालावधीत एवढे अंतर पार करणारा हा पहिलाच वाघ.
- डॉ. बिलाल हबीब, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
वाघांचा कॉरिडॉर निश्चित
वॉकरमुळे विदर्भातील वाघांचा कॉरिडॉर निश्चित झाला आहे. याचा उपयोग वाघांच्या संरक्षणासाठी आणि पर्यटकांच्या नियोजनासाठी निश्चितपणे होण्यास मदत मिळणार आहे.
किशोर रिठे, सातपुडा फाउंडेशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.