आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकट मुलाखतीत अभय बंग यांचा कडाडून प्रहार:आजची शिक्षण पद्धती म्हणजे रोहयो अन् मुले म्हणजे रेसकोर्स

वर्धा / अतुल पेठकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या शिक्षण पद्धतीइतकी मोठी शोकांतिका नाही. शेतीनंतरची सगळ्यात मोठी इंडस्ट्री शिक्षणाची आहे. एका अर्थाने आजची शिक्षण पद्धती म्हणजे रोजगार हमी योजना असून मुलांचा रेसकोर्स झाला आहे, अशी टीका “महाराष्ट्र भूषण’ डाॅ. अभय बंग यांनी येथे केली. संमेलनात शनिवारी मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाट व विवेक सावंत यांनी डाॅ. बंग यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी बंग यांनी रोखठोक भूमिका घेतली.

सुमारे १५ ते २० कोटी लोकांना रोजगार देणारी ही इंडस्ट्री आहे. आजची शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करून त्यांना बैल म्हणून कामाला जुंपण्याचे काम करते. “निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जगणे’ असे विनोबा म्हणायचे. अगदी तसेच शिक्षण आता मिळत आहे. यातून बाहेर यायचे असेल तर विनोबा म्हणत त्याप्रमाणे जीवन हेच शिक्षण या सूत्राने शिक्षण घेतले पाहिजे, असे डाॅ. बंग यांनी सांगितले. समाजात समस्या आहेत तोपर्यंत संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे काम कधीही संपू शकत नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ता कधीही निवृत्त होऊ शकत नाही. अलीकडे संशाेधनासाठी प्रश्नच सापडत नाही. म्हणून अपवाद वगळता बहुतांश संशोधन निरुपयोगी विषयांवर होते, याकडे डाॅ. बंग यांनी लक्ष वेधले.

समाजात खूप समस्या आणि प्रश्न आहेत. लोकांचे ऐकण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची तयारी ठेवली म्हणजे संशोधनासाठी नवनवीन विषय मिळतात. आम्ही अशा पद्धतीने केलेल्या संशोधनामुळे अनेकदा जागतिक आरोग्य संघटनांच्या संशाेधनाला नवी दिशा मिळाली हे डाॅ. बंग यांनी अनेक उदाहरणे देत या वेळी बोलताना सांगितले.

महात्मा गांधी यांच्याकडे ललित लेखकांचे दुर्लक्ष महाभारतानंतर महात्मा गांधींचे जीवन आणि त्यांचा स्वातंत्र्य लढा हा लेखनासाठी खूप मोठा कॅन्व्हास आहे. पण दुर्दैवाने या कॅन्व्हासकडे ललित लेखकांचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. १९२० ते १९४७ या कालखंडाकडे लेखकांनी दुर्लक्ष का केले, हा प्रश्नच आहे. रशियन क्रांतीवर मॅक्झिम गार्कीने “मदर’ ही कादंबरी लिहिली, तर फ्रेंच क्रांतीवर व्हिक्टर ह्युगोने “ला मिझरेबल’ लिहिली. पण, गांधींइतका सुंदर आणि मोठा कॅन्व्हास असूनही ललित लेखक त्यापासून निर्लिप्त राहिले. त्यांनी गांधींची उपेक्षा व उपहास केला.

बातम्या आणखी आहेत...