आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ 500 ते 1000 रुपये देऊन बिहारमधून नागपुरात मुलांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश लाेहमार्ग पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहे.
लहान मुलांसाठी काम करणारी सामाजिक संस्था आणि आरपीएफच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर दोन संशयित आरोपींसह 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. या दोन आरोपींनी या चिमुकल्यांची बिहारमधून नागपुरात तस्करी केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस आता नागपुरातील त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध घेत आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर मिळालेल्या मुलांचे चाइल्ड लाइन टीमकडून समुपदेशन केले जाईल. यासोबतच कागदपत्रे तपासून त्यांचे नेमके वय जाणून घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.
नागपूर रेल्वे स्थानकावर गेल्या महिन्यात 27 मार्चला सहा अल्पवयीन मुलांसह दोन संशयितांना आरपीएफ आणि "बचपन बचाओ संस्थे'च्या प्रतिनिधींनी ताब्यात घेतले होते. त्यांना पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. या प्रकरणात मानवी तस्करी करून ही सर्व मुले बिहारमधून आणल्याचे लोहमार्ग पोलिसांनी तपासा दरम्यान उघड केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शंभू आणि विकास नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे.
या टोळीने अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांना केवळ 500 ते 1000 रुपये देऊन या मुलांना बिहारमधून नागपुरात आणले. पेपर मिलमध्ये काम करण्यासाठी मुलांना नेत असल्याचे कारण सांगून या मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी करण्यात आली होती. आणि येथे ही मुले टोळीच्या अन्य सदस्यांच्या ताब्यात देण्यात आली होती. या प्रकरणी जितेंद्र, राजकुमार आणि जंबवा नावाच्या तीन साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत. ते बिहारमधून या मुलांची तस्करी करून त्यांना नागपूरला पाठवायचे. मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना महिन्याला 10 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.