आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त काही लागेना:नागपूर ते मुंबई 10 तासात प्रवासाचे स्वप्न अधांतरी; दोन वर्षांत 10 तारखा

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाला समृद्धीचा मार्ग दाखवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन नेमके कधी होणार असा प्रश्न आता राज्यातील जनतेकडून विचारला जात आहे. कारण तारखावर तारखा पडूनही महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काही केल्या लागत नाही. परिणामी दहा तासात नागपूर ते मुंबईत कधी जाता येईल याची जनतेला प्रतीक्षा आहे.

गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या किमान १० वेळा तारखा जाहीर झाल्या. मात्र, एकदाही उद््घाटनाचा मुहूर्त साधण्यात विद्यमान आणि यापूर्वीच्या सरकारला यश आलेले नाही. विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असा दावा प्रारंभापासून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर विदर्भ एकदम सुजलाम सुफलाम होईल असे चित्र रंगवले जात आहे. असा हा समृद्धी महामार्ग अजूनही उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षात “समृद्धी एक्सप्रेस- वे’ च्या उद्घाटनाचा अनेक वेळा मुहूर्त ठरला. कधी कुठे बांधकामाचा काही भाग कोसळणे, तर कुठे अपूर्ण काम अशा अनेक कारणांनी उद्घाटन टळत गेले. आता-तर लोकांना देखील समृद्धी महामार्ग उद्घाटनाची उत्सुकता राहिलेली नाही.

गेल्याचं महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात होईल, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागण्यात आली आहे, असे जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समृद्धीच्या उद्घाटनाला नोव्हेंबरचा मुहूर्त निघाला असल्याचे सांगितले होते. मात्र,आता पून्हा नवीन डेडलाईन समोर आली आहे. समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबर ऐवजी आता जानेवारी महिन्यात करण्याचा बेत असल्याची नवीन तारीख जाहीर झाल्याने तारीख पे तारीख वाला खेळ कधी संपणार हा प्रश्न जनतेला पडलेला आहे.

नवनवीन तारखा : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची पहिली तारीख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. सुरुवातीला नागपूर ते शेलू बाजार, वाशिम असा २१० किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन १ मे २०२० ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते मात्र, तो मुहूर्त हुकला. त्यामुळे नवा मुहूर्त म्हणून १५ ऑगस्ट ही डेडलाईन ठरवण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२१, ३१ डिसेंबर २०२१, ३१ मार्च २०२२ तारीख देण्यात आली होती. मावळत्या सरकारने यावर्षी मे आणि नंतर जून महिन्यात मुहूर्त ठरवला होता. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर घडल्यामुळे उद्घाटन पुन्हा मागे पडले. आता नवीन सरकारने यावर्षी नोव्हेंबरमध्ये उद्घाटनाचा बार उडवू अशी घोषणा केली. मात्र, तीही हवेत विरल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पुढील वर्ष उजाडणार हे निश्चित झाले आहे.

समृद्धी आणि फडणवीस : यापूर्वी १ मे २०२२ रोजी महाराष्ट्रदिनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार होते. त्यावेळी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरून तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला होता. मुंबई मेट्रोच्या उद्घाटन पत्रिकेत फडणवीसांचे नाव नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले नव्हते. १ मे रोजी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गामधून माझे नाव मिटवू शकणार नाही, असे ठणकावून सांगितले होते.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण मोदींच्या हस्तेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात नुकतेच नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले होते. समृद्धी महामार्गाची काही कामे अपूर्ण आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्यामुळे त्यात कुठेही त्रूटी वा कमतरता राहू नये याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटन करू, असे फडणवीस यांनी सांगितले होते

बातम्या आणखी आहेत...