आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:झाडे प्राणवायू, सावली, फळे देतात; सेलिब्रिटी आपल्याला काय देतात?

वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधीनगरी येथे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनात शनिवारी अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक नागराज मंजुळे व कवी किशोर कदम, सौमित्र यांच्याशी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, लेखक अरविंद जगताप व बालाजी सुतार यांनी “मुक्त संवाद’ साधला.

या कार्यक्रमात सयाजी शिंदे यांनी सेलिब्रिटींपेक्षाही झाडे महत्त्वाची असल्याचे ठासून सांगितले. झाडे प्राणवायू देतात, पांथस्थाला सावली देतात, फळे देतात. सेलिब्रिटी काय देतात? असा थेट प्रश्न सयाजी शिंदे यांनी केला. साहित्य संमेलन होते तसे वृक्ष संमेलन कधी होणार, असा सवाल सयाजी शिंदे यांनी केला. त्यावर सौमित्र यांनी वाचलेली माणसे वाचली म्हणून झाडे वाचली असे सांगितले. नागराज मंजुळे यांनी लय भरभरून श्वास घेतला. झाडे राहतील व माणसेच राहिली नाही तर झाडे जगवणार कोण, असा सवाल मंजुळे यांनी केला. झाडांवरून सुरू झालेले मतभेद अखेर झाडांसाठी माणसं आणि माणसांसाठी झाडं जगणं आवश्यक आहे यावर एकमत होऊन मिटले.

यशाचे निश्चित असे काही सूत्र वा गणित नसते. त्यामुळे आपण काम करीत राहिले पाहिजे. वाटा किती दूर जाऊ शकतात आणि वाटातून निघालेल्या वाटा किती दूर जाऊ शकतात हे माहिती नसते. म्हणून कलाकाराने काम करीत राहिले पाहिजे, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले. डिग्री घेणे आणि अक्कल येणे यात खूप फरक असतो. अभिनयाचे प्रशिक्षण घेणारे सर्वच जण अभिनेते होत नाहीत. त्यामुळे इच्छाशक्ती, वेड आणि आवडीने काम करीत राहिले पाहिजे. यशस्वी होण्याचा कोणताही फार्म्युला नाही, असे सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. स्वत:चे बोट धरून स्वत:चा शोध घेत स्वत:ची जागा शोधावी लागते. आयुष्यात ठरवून काही करता येत नाही, असे सर्वांनी सांगितले.यावेळी प्रसिध्द लेखक अरविंद जगताप यांनी वाचन केले पाहिजे, असे उपस्थितांना सांगितले.

सेलिब्रिटींनी सांगितले आपले अनुभव या परिसंवादामध्ये बऱ्यापैकी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सयाजी शिंदे यांनी आपल्याला चित्रपट कारकीर्दीबाबतही या वेळी माहिती दिली. नागराज मंजुळे यांनीही विविध विषयांवर चर्चा केली. कवी सौमित्र यांनी या वेळी आपले मत व्यक्त करून आपल्या अभिनय क्षेत्रातील अनुभावाबाबत माहिती दिली. सेलिब्रिटी आल्यामुळे या परिसंवादामध्ये बऱ्यापैकी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमानंतर सेलिब्रिटींसोबत अनेकांनी फोटोसेशन केले.

बातम्या आणखी आहेत...