आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:राज्यातील अडीच लाख फार्मासिस्ट कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित

नागपूर / अतुल पेठकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेडिकल स्टोअर्समध्ये 24 तास सेवा देणाऱ्या फार्मासिस्टचा समावेश नाही

स्टेट फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत राज्यातील २ लाख ५० हजार फार्मासिस्टकडे राज्य सरकारचे अजूनही दुर्लक्ष आहे. डाॅक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस आदी कोरोना योद्ध्यांमध्ये सरकारने अजूनही मेडिकल स्टोअर्समध्ये २४ तास सेवा देणाऱ्या फार्मासिस्टचा समावेश केलेला नसल्याची माहिती आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ उपाख्य अप्पासाहेब शिंदे यांनी “दिव्य मराठी’ला दिली.

देश आणि राज्यपातळीवर फार्मासिस्टकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. येत्या २४ मार्चला कोरोना प्रसाराला एक वर्ष पूर्ण होईल. २४ मार्च २०२० पासून अहोरात्र सर्व फार्मासिस्ट डाॅक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस आदी कोरोना योद्ध्यांच्या बरोबरीने काम करीत आहेत. आतापर्यंत देशात सुमारे ३५० तर राज्यात २० ते २२ फार्मासिस्टचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय ४५० ते ५०० केमिस्ट व फार्मासिस्टचे कुटुंबीय बाधित झाले. पण, त्याची साधी दखल घेण्याचेही सौजन्य राज्याच्या आरोग्य विभागाने दाखवलेले नाही. संपूर्ण देशात ८ लाख ५० हजार मेडिकल स्टोअर्स असून १२ ते १५ लाख फार्मासिस्ट आहेत. राज्यात ७५ हजार केमिस्ट असून २ लाख ५० हजार नोंदणीकृत फार्मासिस्ट असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाशी या संदर्भाने किमान ५ ते ७ वेळा पत्र व्यवहार केला. पण, दखल घेतली नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

डाॅक्टर, परिचारिका, पोलिसांप्रमाणेच औषध विक्रेत्यांचाही २४ तास रुग्णांशी संबंध येतो. सबब त्यांनाही लसीकरणात सहभागी करून घेण्यात यावे, असे पत्र महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी ५ नोव्हेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. तर आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ उपाख्य अप्पासाहेब शिंदे यांनी ८ जानेवारी २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना लिहिलेल्या पत्रात मेडिकल दुकानदार, फार्मासिस्ट व त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची विनंती केली. केंद्र व राज्य सरकारने केमिस्ट व फार्मासिस्टची दखल घेत त्यांच्या पाठीवर साधी कौतुकाची थापही मारली नाही.

केमिस्ट फार्मासिस्ट
राज्यातील विक्रेते : ७५०००
रजिस्टर्ड फार्मासिस्ट : २ लाख ५० हजार
राज्यात कोरोनामुळे मृत्यू : २० ते २२ केमिस्ट व फार्मासिस्ट
बाधित : सुमारे ४५० ते ५०० कुटुंबीय

देशातील औषध विक्रेते : ८ लाख ५० हजार रजिस्टर्ड फार्मासिस्ट : सुमारे १२ ते १५ लाख देशात कोरोनामुळे मृत्यू : ३५० ते ४०० कोरोनाबाधित : ३००० ते ३५०० कुटुंबीय

बातम्या आणखी आहेत...