आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वीज पडून तीन वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांसह बैलजोडी ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. योगेश रमेश पाठे (२७, हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (३४) व बाबाराव मुकाजी इंगळे(६० दोघेही मुक्तापूर) ही मृतकांची नावे आहे.
वीज कोसळलेली गावे ही आजूबाजूला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिवरमठ येथील योगेश रमेश पाठे हा घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात पेरणी करीत होता. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने योगेश घरी जाण्यासाठी रस्त्यावरील दुचाकीजवळ पोहोचला. अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे दहा दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याला वडील नसून मोठा भाऊ व आईसोबत राहायचा. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे.
मुक्तापूर शिवारात पावसामुळे शेतातील झोपडीत दिनेश ज्ञानेश्वर कामडी व बाबाराव मुकाजी इंगळे हे दोघेजण बसले होते. विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक वीज झोपडीवर कोसळली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतक दिनेशचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अधिक वेळ होऊनही शेतातून का परतले नाही म्हणून दिनेशचे वडील शेतात पाहायला गेले असता दोघेही शेतातील झोपडीत मृतावस्थेत पडून होते.
तत्काळ, घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. तसेच पिंपळगाव (राऊत ) शिवारात भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून बैलजोडी दगावली. घटनेची माहिती मिळताच नरखेड पंचायत समिती सभापती नीलिमा सतीश रेवतकर यांनी भेट दिली. त्यानंतर तलाठी तारकेश्वर घाटोले, वसंत नासरे, राऊत यांनी तिन्ही घटनांची माहिती पोलीस व तहसीलदार जाधव यांना दिली. ठाणेदार मनोज चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.