आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाभूल:महाराष्ट्र बँकेची पावणेदोन कोटींचीफसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक, दोन महिन्यांपूर्वी जयंत पाटलांनी तरुण चेहरा म्हणून राष्ट्रवादीत घेतले होते

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र बँकेची १ कोटी ८९ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला लक्कडगंज पोलिसांनी गजाआड केले आहे. दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अल्पसंख्यांक समाजाचा तरुण चेहरा म्हणून पक्षात प्रवेश दिलेल्या गुलाम अशरफीला बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाम अशरफीने त्याच्या “यंग फोर्स’ या संघटनेच्या माध्यमातून शेकडो गरीब टॅक्सी चालकांसह इतर वाहन चालकांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. लक्कडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत इतवारीत बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. गुलाम अशरफी वल्द प्यारे अशरफी (वय ४०) याने १ कोटी ८९ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ४७१ आदी कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात येऊन गुलाम अशरफी वल्द प्यारे अशरफी याला अटक करण्यात आली.

असा करीत असे फसवणूक ः गरीब वाहनचालकांना बँकेतून कर्ज घेऊन महागडे वाहन खरेदी करायला लावायचे, नंतर ते बँकेचे हप्ते भरण्यास अपयशी ठरल्यानंतर त्यांना तेव्हा सुरुवातीला बँकेच्या वसुली पथकाच्या कारवाईपासून संरक्षण द्यायचे, आणि नंतर स्वतः बँकेसोबत सेटलमेंट करून हप्ते थकल्यामुळे जप्त झालेले वाहन लिलावात कवडीमोल भावात स्वतः खरेदी करायचे ही त्याची पद्धत होती. याच पद्धतीने गुलाम अशरफीने अनेक ट्रक्स, जेसीबी, फॉर्च्युनरसारख्या महागड्या गाड्या आणि अनेक मालवाहतूक वाहन आपल्या नावावर करून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

बनावट कागदपत्रांवर कर्जाची उचल ः इतकेच नाही तर गुलाम अशरफीने आपण वेस्टर्न कोल फिल्ड्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत खोट्या सॅलरी स्लिप आणि इतर कागदपत्रे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रातून पहिल्यांदा एक कोटी तर दुसऱ्यांदा ८९ लाख रुपयांचे कर्ज उचलले. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर काही वित्तीय संस्थांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सखोल तपास करून पोलिसांनी काळजी म्हणून गुलाम अशरफीला सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. फसवणूक झालेल्या वाहन चालकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार द्यावी असे आव्हान पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.

गुलाम अशरफी विरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल
विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्या गुलाम अशरफी विरोधात यापूर्वीही हत्येच्या प्रयत्नांसह मारहाण करणे, धमकावणे, खंडणी वसूल करणे, दंगल करण्याचे गुन्हे नागपूरच्या विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...