आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंशी भेट:'भीक मागणे' वक्तव्याच्या समर्थनार्थ प्रबोधनकारांच्याच पुस्तकाचा दिला दाखला

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नागपुरात आहेत. ही संधी साधत भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज थेट उद्धव ठाकरेंच्या यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रबोधनकारांचेही तेच शब्द

भेटीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे यांचे एक पुस्तक भेट दिले व पुस्तकातील 'भीक मागणे' या संदर्भातील उल्लेख वाचून दाखवला. या पुस्तकात 'एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो', असा उल्लेख आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना वाचून दाखवले.

बाजू समजावून सांगितली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून चांगलाच गदारोळ उडाला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली होती. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना आपली बाजू समजावून सांगितली.

उद्धव ठाकरेंचे केवळ स्मित

आज चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे 'माझी जीवनगाथा' हे पुस्तक भेट दिले. याच पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. हा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. या भेटीचा व्हिडिओही आता समोर आला आहे. यात उद्धव ठाकरे केवळ स्मितहास्य करताना दिसत आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उद्धव ठाकरे यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शब्दाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक भेट दिले व त्यातील संदर्भ वाचून दाखवला, त्यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे तसेच भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...