आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरेड बलात्कार घटनेतील पीडितेला भाजपकडून 1 लाखाची मदत:भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची घोषणा, पीडितेच्या कुटुंबीयांसोबत भेट

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर आठ ते नऊ जणांनी अत्याचार केला. या घटनेतील पीडितेला भारतीय जनता पार्टीच्या आपदा कोशामधून एक लाखाची मदत करण्यात येईल, अशी माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी येथे दिली. पीडितेच्या घरी भेट देण्यासाठी आल्या असता त्या माध्यमांशी बाेलत होत्या.

महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून मनोधैर्य योजनेच्या मार्फत देण्यात येणारी मदत तत्काळ देण्याबाबतची विनंती आम्ही संबंधित खात्याला करणार आहोत. पण त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीच्या आपदा कोशामधून एक लाखाचा एक निधी पक्षातर्फे त्या कुटुंबाला देत आहोत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

आर्थिक परिस्थिती बेताची

उमरेडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर जवळपास आठ ते नऊ जणांनी सामूहिक अत्याचार केला. या केसमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. कारण एका वेगळ्या प्रकरणांत तपास सुरू असताना त्यांना काही सुगावा लागला आणि त्यातूनही भयंकर अशी घटना समोर आली. कुणीही तक्रार न करता सुमोटोमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपींना पकडले. म्हणून त्यांचे कौतुक आहे. पीडित मुलीला वडील नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच आहे. रोजच्या जगण्याचे प्रश्न आहे.

प्रत्येक जण महाराष्ट्रीयन

महाराष्ट्रातून गुजराथी आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले, तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. याबाबत विचारले असता, महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक जण महाराष्ट्रीय आहे. आणि महाराष्ट्राच्या उभारणीत प्रत्येकाचे काही ना काही योगदान आहे. सर्वच पक्षांत सर्व भाषक लोक आहेत. इथे राहणारा प्रत्येक जण महाराष्ट्रीय आहे, अशा दृष्टीने आपण पाहिले पाहिजे, असे वाघ यांनी स्पष्ट केले.

तातडीने पंचनामे

शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या भेटी घेत तत्काळ मदतीचे निर्देश दिले. तातडीने पंचनामे झाले. अजूनही पंचनामे होत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना प्रत्यक्ष मदतही मिळणार आहे. उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम हे सरकार नव्हे तर विरोधक करीत असल्याची टीका वाघ यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...